
नवी दिल्ली, दि. 18 (विशेष प्रतिनिधी) – ‘व्ही बी जी राम जी’ विधेयकावरून लोकसभेत आज जोरदार गदारोळ झाला. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे विधेयक मांडताच तुफान गदारोळ झाला. विरोधी सदस्यांनी हौद्यात धाव घेत घोषणाबाजी केली. विधेयकाच्या प्रती टराटरा फाडून त्याचे तुकडे अध्यक्षांच्या व मंत्र्यांच्या दिशेने भिरकावले. यावेळी झालेल्या गोंधळातच सरकारने हे विधेयक मंजूर करून घेतले.
महात्मा गांधी यांचे नाव असलेल्या ‘मनरेगा’ योजनेचे नामांतर करून काही किरकोळ बदलासह सरकारने ‘व्ही बी जी राम जी’ ही रोजगार हमी योजना आणली आहे. त्याला विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या विधेयकावर बुधवारी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत लोकसभेत चर्चा झाली. आज औपचारिकरीत्या ते लोकसभेत मांडण्यात आले. त्यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी महात्मा गांधींचे नाव या योजनेतून वगळण्याच्या सरकारच्या निर्णयाचा धिक्कार केला. ‘मनरेगा’ योजना संपवण्याचाच हा कट आहे, अशी टीका खासदार प्रियंका गांधी यांनी केली, तर जोरदार घोषणाबाजी करत विधेयकाच्या चिठोऱया करून त्या अध्यक्षांच्या व मंत्र्यांच्या दिशेने भिरकावल्या. त्यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळाचा फायदा घेत सत्ताधाऱयांनी आवाजी मताने हे विधेयक मंजूर करून घेतले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
महात्मा गांधी यांचे नाव असलेल्या मनरेगा योजनेच्या जागी ‘विकसित भारत जी राम जी’ विधेयक गुरुवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाला संसदेबरोबरच बाहेरही विरोध करण्यात आला. चेन्नईमध्ये काँग्रेससह विविध पक्षांनी महात्मा गांधी यांचे छायाचित्र हातात घेत आंदोलन केले व मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
निवडणुकीपुरते गांधीजी आठवतात!
नव्या योजनेतून महात्मा गांधींचे नाव वगळल्याचा विरोध आरोप करत आहेत. मात्र मुळात ही योजना लागू झाली त्यावेळी तिचे नाव नरेगा होते. 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक डोळय़ासमोर ठेवून त्यात महात्मा गांधींचे नाव जोडले गेले. काँग्रेसला फक्त महात्मा गांधी मतांसाठी हवे असतात, असे शिवराजसिंग चौहान म्हणाले.
संसद भवनात मार्च
संसदेच्या प्रांगणात विरोधी पक्षाच्या खासदारांनी मार्च काढला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह 50 हून अधिक खासदार यात सहभागी झाले होते. ‘तानाशाही नही चलेगी…’, ‘गांधीजी का अपमान नही सहेगा हिंदुस्थान…’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. नवे विधेयक हा गांधीजींचा अपमान आहे, अशी टीका खरगे यांनी केली. ओम बिर्ला संतापले!
विरोधी पक्षाच्या खासदारांच्या या कृतीमुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतापले. ‘विधेयक फाडण्यासाठी जनता तुम्हाला लोकसभेत पाठवत नाही. जनहिताचे मुद्दे तुम्ही सभागृहात मांडायला हवेत. खासदार म्हणून जबाबदारीने वागायला शिका,’ असे बिर्ला म्हणाले.
गाय दूध देत नसेल तर रामनाम घ्या!
भाजप खासदार अजय भट्ट यांनी नव्या विधेयकाचे समर्थन करत प्रभू रामाच्या कृपेमुळेच सगळे सुरू असल्याचे सांगितले. ‘मुलीचे लग्न होत नसेल, नोकरी लागत नसेल, घरात शांतता नसेल, नवरा-बायकोचे जमत नसेल, अगदी गाय दूध देत नसेल तर रामनाम घ्या. सर्व काही सुरळीत होईल,’ असा चिमटाही भट्ट यांनी विरोधकांना काढला.




























































