
उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये पोलिसांनी एका अनोख्या चोरीचा पर्दाफाश केला आहे. या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फतेहपूर चौरासी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पोल्ट्री फार्ममधून 36 कोंबड्यांची चोरी करण्याती आली. या कोंबड्यांना कारमधून नेणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरीसाठी आरोपींनी आलिशान कारचा वापर केल्याने पोलिसही अवाक झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष नगर येथील रहिवासी आणि पोल्ट्री फार्मचे मालक शरीफ यांनी 17 डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्यांनी पोल्ट्री फार्मची जाळी तोडून मोठ्या संख्येने कोंबड्यांची चोरी केली. शरीफ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी चिरंजूपुरवा येथील रहिवासी असलेल्या 30 वर्षीय सरोज याला ताब्यात घेतले. पोलिसांनी जेव्हा त्याच्या कारची झडती घेतली, तेव्हा त्यांना कारच्या डिक्कीत आणि पुढच्या-मागच्या दोन्ही सीटवर कोंबड्या कोंबलेल्या अवस्थेत आढळल्या. पोलिसांनी या कारमधून चोरीला गेलेल्या ३६ कोंबड्या जप्त केल्या असून आरोपी सरोजला अटक केली आहे. मात्र, त्याचे दोन साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
फतेहपूर चौरासी पोलिसांनी या कारवाईचा व्हिडिओ शेअर केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आले असून परिसरात गस्त वाढवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.




























































