दिल्लीसह पाच राज्यांत दाट धुके, हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी

दिल्ली, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आज दाट धुके पसरले. हवामान विभागाने पाचही राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. धुक्यामुळे रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक विस्कळीत होईल, असा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये राज्य सरकारने लोकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

उत्तर प्रदेशमधील बरेली, लखनऊ, अयोध्या, गोंडासह 20 जिह्यांमध्ये दाट धुके आहे. बरेली, कानपूर, आग्रा, कासगंज, औरैया आणि जौनपूरमध्ये 20 डिसेंबरपर्यंत शाळा बंद करण्यात आल्या आहेत. लखनऊसह 10 जिह्यांमध्ये शाळांची वेळ सकाळी 9 वाजल्यापासून करण्यात आली आहे. राज्यात पुढील तीन दिवस कडाक्याच्या थंडीचा इशारा देण्यात आला आहे. बिहारमधील नालंदा, गोपालगंज, छपरासह 19 जिह्यांमध्ये धुक्याचा परिणाम दिसून आला. सारणमध्ये आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यभरात 14 रेल्वे गाडय़ाही उशिराने धावल्या. गोपालगंजमध्ये धुक्यामुळे 2 बस आणि एका ट्रकमध्ये धडक झाली, ज्यात एकाचा मृत्यू झाला, अनेक जखमी झाले. छपरात एका बसने 3 गाडय़ांना धडक दिली.

शुक्रवारी दिल्ली एनसीआरमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स एकदम खराब श्रेणीत राहिला, तो साधारण 382 एवढा नोंदवण्यात आला.

उत्तर प्रदेशातील अलिगढ, बागपत, बरेली, बिजनौर, आगरा, मथुरा, मेरठ, मुरादाबाद, मुझफ्फरनगर, फिरोजाबाद, हाथरस, पीलीभीत आदी जिह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.