
जैवविविधतेतील दुर्मिळ गोष्टी जगासमोर आणणाऱया ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली फाऊंडेशनमधील वनस्पतीतज्ञांनी अरुणाचल प्रदेशात हेन्केलिया मल्टीफ्लोरा या नवीन वनस्पती प्रजातीचा शोध लावला आहे.
अरुणाचल प्रदेशातील सियांग नदीच्या खोऱयात हेन्केलिया मल्टीफ्लोरा या प्रजातीचा शोध लागला. अरुणाचलात आतापर्यंत अशा वनस्पतींच्या 20 प्रजाती आढळून आल्या आहेत. हेन्केलिया मल्टीफ्लोरा या वनस्पतीवर नावाप्रमाणेच एका फुलोऱयावर 30 पेक्षा जास्त फुले असतात, असे या शोधामध्ये सहभागी असलेले वनस्पतीतज्ञ नवेंदू पागे यांनी सांगितले.
हेन्केलिया मल्टीफ्लोरा या वनस्पतीबाबत आम्ही स्थानिक लोकांकडून माहिती घेतली असता त्यांनी या वनस्पतीची फुले खातात असे सांगितले. त्या फुलांची चव आंबट असते. या वनस्पतीला मोहरीसारख्या शेंगा असतात. त्यातील बिया मात्र मोहरीच्या दाण्यापेक्षाही बारीक असल्याने वाऱयाने उडून इतरत्रही या वनस्पती वाढल्याचे दिसून येते, असे पागे यांनी सांगितले.
हेन्केलिया या प्रजातीमध्ये जगभरात सुमारे 70-80 प्रजाती आहेत. हिंदुस्थानात आजपर्यंत सुमारे 42 प्रजाती आढळल्या असून त्या पश्चिम हिमालय, ईशान्य हिंदुस्थान आणि दक्षिण हिंदुस्थानात आढळतात. ईशान्य हिंदुस्थानात या प्रजातींचे सर्वाधिक प्रमाण अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. तिथे आतापर्यंत 27 प्रजाती नोंदवल्या गेल्या आहेत.
हेन्केलिया या प्रजातीमधील वनस्पती या वनौषधी प्रकारातल्या असून त्यांची उंची एक मीटरपेक्षा कमी असते. पण हेन्केलिया मल्टीफ्लोरा ही वनस्पती दोन मीटरपर्यंत वाढते असे दिसून आले. तेजस ठाकरे, एस. किशवान आणि नवेंदू पागे यांनी लावलेल्या या शोधाचा अहवाल ‘एडिनबर्ग जर्नल ऑफ बॉटनी’ या वनस्पतीशास्त्राच्या प्रतिष्ठत नियतकालिकामध्ये नुकताच प्रकाशित झाला आहे.






























































