सातारा ड्रग्ज प्रकरणाची चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे यांना पदावरून हटवा, शिवसेना खासदारांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र

सातारा जिह्यातील सावरी गावात मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्जचा साठा सापडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ हा ड्रग्स साठा आढळल्या प्रकरणाची चौकशी व्हावी. ही चौकशी होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावरून बाजूला करावे, अशी मागणी शिवसेना खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सातारा जिह्यातील सावरी गावात छापा टाकण्यात आला. जिथे एका दुर्गम भागात असलेले एक शेड आढळून आले आणि सुमारे 45 किलो एमडी अमली पदार्थ अंदाजे 145 कोटी किमतीचे जप्त करण्यात आले. या कारवाईत अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली. इतक्या मोठय़ा प्रमाणावरील अमली पदार्थांची हालचाल असताना सातारा पोलीस यंत्रणेला याची माहिती कशी नव्हती? जर माहिती होती तर राजकीय दबावामुळे कारवाई टाळण्यात आली का? असे प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित करत या प्रकरणाकडे आवश्यक तेवढय़ा गांभीर्याने पाहून कारवाई करावी. तसेच या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे यांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी, भाऊसाहेब वाक्चौरे, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाजे, नागेश पाटील-आष्टीकर यांनी एका पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

ड्रग्ज ज्या शेडमध्ये आढळले ती शेड ‘तेजयश’ नावाच्या रिसॉर्टपासून अवघ्या 1200 मीटर अंतरावर आहे. रिसॉर्टपासून थेट शेडपर्यंत रस्ता बांधण्यात आलेला असून अशा प्रवेश मार्गामागील हेतूवर गंभीर प्रश्न निर्माण होतात, असे पत्रात नमूद केले आहे.

 ‘तेजयश’ रिसॉर्ट कोयना धरणाच्या अत्यंत जवळ असल्याने ते बेकायदेशीर असल्याचा आरोप आहे. प्रचलित नियमांनुसार मोठय़ा जलसाठय़ाच्या ठरावीक अंतरात कोणतेही बांधकाम करण्यास मनाई आहे. अशा उल्लंघनाला परवानगी देणाऱया किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱया संबंधित अधिकाऱयांची भूमिका सखोल तपासणीस पात्र असल्याचे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.