
>>डॉ. आशुतोष कुलकर्णी
सतत होणारी सर्दी म्हणजे एक डोकेदुखीच आहे. ती वैद्याला आणि रुग्णाला दोघांनाही सतावते. एकाला रुग्ण बरा होत नाही म्हणून तर एकाला सतत औषधे घ्यावी लागतात म्हणून. या सर्दीवर खरा उपाय आहे शुद्ध हवा आणि पथ्य.
पहाटेची वेळ. आपल्या घरात निवांत झोपलेला तरुण श्वास घेता येत नाही म्हणून धडपड करून उठला. बिछान्यासमोरच एक घडय़ाळ लाल अक्षरे दाखवत होते. ‘बीईईईप बीईईईप’ ओरडत होते. ‘रिचार्ज वेळेवर न केल्याने तुमचा ऑक्सिजनचा बॅलन्स संपलेला आहे. जिवंत राहायचं असेल तर त्वरित रिचार्ज करा’ अशा मथितार्थाचा मेसेज मोबाईलवर आला. पटकन त्याने रिचार्ज केला आणि ऑक्सिजन पूर्ववत सुरू झाला आणि त्याने सुटकेचा निश्वास टाकला.
ही कुठल्या सिनेमाची कथा नाही. हे वास्तव हळूहळू आपल्याकडे येऊ घातले आहे. परवा एका मोठय़ा मॉलमध्ये हवा शुद्धीकरण करणारी महागडी यंत्रे विकायला ठेवलेली बघितली आणि छातीत धस्स झाले. कुठे नेऊन ठेवले आपण आपले शुद्ध पर्यावरण आणि शुद्ध हवा? याचाच परिपाक म्हणजे सततची होणारी सर्दी. ती एक डोकेदुखी आहे. ती वैद्याला आणि रुग्णाला…दोघांनाही सतावते. एकाला रुग्ण बरा होत नाही म्हणून तर एकाला सतत औषधे घ्यावी लागतात म्हणून.
सर्वसाधारण सर्दीच्या रुग्णांमध्ये नाकांतर्गत वेदना, नाक बंद होणे, घसा, तोंड, ओठ कोरडे पडणे, डोके दुखणे, दात शिवशिवणे अशी सामान्य लक्षणे असतात. यापुढे त्याचे रूपांतर जीर्ण सर्दी आणि त्यामुळे येणारे बहिरेपण, अंधत्व, वासाचे ज्ञान नष्ट होणे, डोळ्यांचे विकार, खोकला यांसारखे उपद्रव होऊ नये म्हणून त्यावर लवकरात लवकर चिकित्सा करणे आवश्यक आहे. प्रदूषण आणि हवेतील धूर, धूळ टाळता येणे शक्य असल्याने आपणच आपली प्रतिकार क्षमता वाढवणे गरजेचे आहे. यासाठी आयुर्वेदातील ‘नस्य कर्म’ हे अत्यंत प्रभावी आहे. योगक्रियांमध्ये शुद्धीसाठी वापरली जाणारी ‘नेती क्रिया’ ही कोरोनाच्या काळात अत्यंत लोकप्रिय झाली. या साध्या वाटणाऱ्या, पण अत्यंत उपयुक्त नेती क्रियेचा वापर करण्याचा अनेक कान, नाक, घसा तज्ञ रुग्णांना सल्ला देतात .
नस्य अनेक प्रकारचे सांगितले आहे. ‘नासाही शिरसो द्वारें’…नाक मस्तिष्काचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे नाकातून टाकली जाणारी औषधे ही अतिशय प्रभावकारी असतात. त्याचबरोबर नाकातून औषधे घेताना योग्य काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
नस्य करण्यापूर्वी करावयाचे पूर्वकर्म ः हलक्या हाताने आपल्या कपाळाच्या मध्यभागी, दोन गालांचे उंचवटे आणि कानामागची गोस्तन आकाराची हाडे या भागात स्नेहन करावे आणि स्वेदन करावे. स्वेदन करताना रुमाल तव्यावर गरम करून त्याचा शेक घ्यावा आणि त्यानंतर खांद्याखाली उशी घेऊन घशात उतरेल अशा बेताने वैद्याने दिलेली औषधे, उदाहरणार्थ स्वरस, तेल, घृत असतील ते नाकात सोडावे. नस्य झाल्यानंतर विविध प्रकारचे काढे गुळण्या करण्यासाठी सांगितले आहेत. त्याचा वापर करून घसा स्वच्छ करावा, जेणेकरून उतरणाऱ्या कफाचा निचरा होईल.
पथ्य ः आहारामध्ये स्निग्धता आवश्यक आहे. ज्यामुळे वात प्रकोप कमी होईल. आहारात साजूक तूप वापरावे. उदाहरणार्थ खिचडी आणि भातावर तूप घालून खावे, उष्ण आहार घ्यावा. गरम अन्न खावे. गार झालेलं अन्न खाऊ नये. आईक्रीम, थंड पेय इत्यादी टाळावे.
शाकाहारी आणि मांसाहारी सूपचे अनेक विविध प्रकार आयुर्वेदात सांगितले आहेत. त्यांचा वापर आहारात करावा. आंघोळीसाठी आणि पिण्यासाठी गरम पाणी वापरावे. अधिक थंड वारे लागणार नाहीत अशाच निर्वात स्थळी शक्यतो राहावे.
घरात वातानुकूलित यंत्रे वापरणे टाळावे. वापरणे अनिवार्य असेल तर वारंवार त्यांची स्वच्छता करून घ्यावी. शक्यतो सकाळी लवकर मॉर्निंग वॉकला जाणे टाळावे. सूर्य उगवल्यावर हवा तापल्यामुळे अभिसरण होऊन जमिनीलगत पसरलेल्या प्रदूषणाचा निचरा व्हायला मदत होते. त्यानंतर चालण्याचा व्यायाम करणे उचित ठरेल. डोके, कान बांधूनच बाहेर पडावे. वेळप्रसंगी चांगल्या प्रतीचे मास्क वापरणे प्रदूषण असलेल्या हवेत हितकारी आहे.
औषधे ः आयुर्वेदात चित्रक, त्रिभुवनकीर्ती, व्योषादी वटी, त्रिकटू व त्रिफळा, महासुदर्शन अशी अनेक औषधे ऋतूनुसार व प्रकृतीनुसार होणाऱ्या सर्दीसाठी सांगितली आहेत. ती योग्य वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली घेणे अत्यंत सयुक्तिक आहे. स्वतच्या बुद्धीने, इंटरनेटवर वाचून अर्धवट ज्ञानाने आयुर्वेदिक औषधे घेऊ नयेत. त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
आवाज बसणे हा असा एक अत्यंत महत्त्वाचा व्यापद सर्दीच्या रोगात दिसून येतो. त्यासाठी गंडूष, कवल, कंकोळ, हळद, सुंठ यांपासून बनविलेली अनेक औषधे उपलब्ध आहेत. एकंदरीत सर्दी या रोगावर मात करण्यासाठी जागतिक पातळीवर उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता, आहार नियोजन, योग्य आचार, वेळीच औषधोपचार अशा बहुआयामी उपाययोजनांना स्वतपासून सुरुवात करून त्या जागतिक पातळीवर राबविणे गरजेचे आहे, तरच ही डोकेदुखी कमी होईल.
























































