पंचलाइन – अँटी-कॉमेडियन

>>अक्षय शेलार

पारंपरिक अर्थाने ‘कॉमेडियन’ कमी आणि अँटी-कॉमेडियन अधिक वाटणारा नॉर्म मॅकडोनाल्ड. नॉर्मचा विनोद हा हसण्याच्या तात्कालिक समाधानाविरुद्धचे एक प्रकारचे बंड होते. अपेक्षा उलथवून टाकणाऱ्या या कलाकाराने रूढ साचे मोडण्याच्या प्रक्रियेत स्वतसाठी अमरत्व मिळवलं.

नॉर्म मॅकडोनाल्ड हा स्टँड-अप कॉमेडीच्या इतिहासातील एक विक्षिप्त, हट्टी आणि अनेक अर्थांनी अस्वस्थ करणारा कलाकार होता. तो प्रेक्षकांना हसवण्यापेक्षा त्यांना गोंधळात टाकण्यात, चिडवण्यात आणि कधी कधी जाणीवपूर्वक नाराज करण्यात अधिक रस घेत असे. त्यामुळेच तो पारंपरिक अर्थाने ‘कॉमेडियन’ कमी आणि अँटी-कॉमेडियन अधिक वाटतो. कारण नॉर्मचा विनोद हा हसण्याच्या तात्कालिक समाधानाविरुद्धचा एक प्रकारचा बंड होता.

नॉर्मच्या स्टँड-अपमधील सर्वात ठळक गोष्ट म्हणजे त्याच्या जोक्सची असह्य वाटावी इतकी लांबलचक रचना. तो एखादा विनोद सुरू करायचा आणि तो इतका भरकटवत न्यायचा की, प्रेक्षकाला पंचलाइन येणार याचाच विसर पडावा. मध्येच अनावश्यक तपशील, भलत्याच दिशेने जाणाऱ्या गोष्टी आणि जाणीवपूर्वक कंटाळवाणे वाटणारे वाक्यप्रयोग यांचा वापर करून तो जोकमधील ऊर्जा, जिवंतपणा मुद्दाम मारून टाकायचा आणि जेव्हा त्याच्यासमोरील बहुतांशी लोक कंटाळून गेले असतील, सेट-अपदेखील विसरून गेले असतील अशा क्षणी नॉर्म एक अगदी कोरडी, फसवी, जवळ जवळ अँटी-कायमॅक्टिक पंचलाइन सादर करायचा.

नॉर्मला प्रेक्षकांच्या आणि सहकलाकारांच्या या अस्वस्थतेतून मिळणारा आनंद त्याच्या परफॉर्मन्सचा अविभाज्य भाग होता. लोक हसले नाहीत, उलट त्याला नापसंती दर्शवली तरीही तो थांबत नसे, किंबहुना प्रेक्षक नाराज झाले, गोंधळले किंवा चिडले, तर नॉर्म अधिक आनंदी होत असे. कारण त्याच्या दृष्टीने कॉमेडी ही केवळ हास्यनिर्मिती नव्हती, तर ती प्रेक्षकांच्या अपेक्षांशी खेळण्याची, त्यांना फसवण्याची आणि त्या प्रक्रियेचा मनसोक्त आस्वाद घेण्याची कला होती. त्यामुळेच तर लोक त्याच्या विनोदावर अजिबातच हसले नाहीत की मग तो अधिक खूश असायचा.

त्याचं हे तत्त्व केवळ स्टँड-अपपुरतं मर्यादित नव्हतं. टॉक शोजवर नॉर्मची उपस्थिती ही स्वतंत्र परफॉर्मन्सच असायची. कॉनन ओ’ब्रायन, डेव्हिड लेटरमन, डेनिस मिलर, इत्यादींच्या कार्यक्रमांमध्ये तो मुद्दाम अशा लांबलचक, रटाळ कथा सांगायचा. तो होस्टच्या चेहऱ्यावरचा संयम सुटण्याचा क्षण अचूक हेरायचा आणि मग त्या क्षणाला आणखी लांबवायचा. टेलिव्हिजनच्या वेगवान जगात पंचलाइनसाठी आणि पोकळ हास्यासाठी सारा खेळ चालणाऱ्या स्वरूपात नॉर्मचा हा संथ, भरकटणारा विनोद हा जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करत असे आणि असे असूनही तो यातील अनेक होस्टचा आवडता गेस्ट होता, याचं कारण त्याचे त्याच्या कलेवरील, भाषेवरील प्रभुत्व.

त्यामुळेच या सगळ्यामागे एक गोष्ट सतत दिसत राहते, ती म्हणजे नॉर्म मॅकडोनाल्ड हा एक अफाट लेखक होता. त्याचे विनोद कितीही लांब, विचित्र किंवा मुद्दाम कंटाळवाणे वाटले तरी त्यामागे असलेली लेखनाची शिस्त, शब्दांची निवड आणि संरचनेची जाणीव अत्यंत तीक्ष्ण होती. तो विनोद ‘वाईट’ असल्याचं, तसेच आपण स्वत वाईट कॉमेडियन असल्याचं नाटक करत असे, पण प्रत्यक्षात तो विनोद कसा काम करतो, कसा पुढे जातो आणि कसा उलट पद्धतीने वापरता येतो याचं गहन ज्ञान त्याच्याकडे होतं. त्याचं सादरीकरण हा मूर्खपणाचा तपशीलवार अभिनय होता. त्यामुळेच त्याच्या प्रसिद्ध ‘मॉथ जोक’मध्ये तो एखाद्या रशियन साहित्यिकाच्या धर्तीवर भाषा वापरत एखादा विनोद कशा पद्धतीने रचतो, हे स्पष्टपणे दिसते. तो मुळातच अब्सर्ड प्रीमाईस (विनोदाचा पाया) असलेली गोष्ट अस्तित्त्ववादी, तत्त्वचिंतनात्मक अंगाने पुढे नेतो आणि अगदीच पांचट म्हणावीशी पंचलाइन आल्यावरही हा संपूर्ण विनोद कायम लक्षात राहतो, यातच नॉर्मच्या एकमेवाद्वितीय शैलीची महती कळते.

नॉर्मच्या एसएनएल वीकेंड अपडेटमधील लेखन, त्याच्या स्टँड-अपमधील रेंगाळणाऱ्या कथा किंवा टॉक शोजवरची त्याची मुद्दाम अडखळ(व)णारी भाषा आणि सादरीकरण या सगळ्यांतून एक गोष्ट स्पष्ट होते की, नॉर्मला पंचलाइनपेक्षा प्रक्रियेत जास्त रस होता. जोक कुठे पोहोचतो यापेक्षा तो तिथपर्यंत कसा जातो, त्या प्रवासात किती लोक वैतागतात, किती लोक गोंधळतात आणि किती लोक शेवटपर्यंत टिकतात याची त्याला अधिक मजा वाटायची. त्यामुळेच तर तो मृत्यू, सिरीयल किलर आणि खून, हिटलर आणि त्याचा कुत्रा, इत्यादी कुठल्याही प्रचंड गंभीर ते विलक्षण हास्यास्पद मुद्दय़ांभोवती आपले विनोद रचू शकत असे.

नॉर्म मॅकडोनाल्ड हा जाणीवपूर्वक (विनोदाचे) अपयश निवडणारा कलाकार होता. नॉर्म मॅकडोनाल्ड हा हसवणारा नव्हे, तर अपेक्षा उलथवून टाकणारा कलाकार होता आणि रूढ साचे मोडण्याच्या या प्रक्रियेतच त्याने स्वतसाठी अमरत्व मिळवलं.

[email protected]