निमित्त – पत्रकारितेतील नवा इतिहास

>>समीर गायकवाड

भारतीय महिलांनी सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटवला असला तरी काही संस्थात्मक सन्मान अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. यातलीच एक बाब होती प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्षपद. हे स्थान महिला पत्रकारांना आजतागायत काबीज करता आलं नव्हतं. मात्र संगीता बरुआ पिशारोती यांनी ही कामगिरी फत्ते केलीय.

जगभरात महिला विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवत असताना भारतीय महिलादेखील आपल्या कार्यक्षेत्रात अग्रेसर राहून नवे कीर्तिमान स्थापन करताना दिसत आहेत. भारतीय महिलांनी जवळपास सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. मात्र काही पदे, काही संस्थात्मक गोष्टी आणि काही सन्मान अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. यातलीच एक बाब होती प्रेस क्लब ऑफ इंडिया अर्थात पीसीआयएलची निवडणूक आणि त्यातलं शीर्षस्थान म्हणजेच अध्यक्षपद. हे स्थान महिला पत्रकारांना आजतागायत काबीज करता आलं नव्हतं. मात्र संगीता बरुआ पिशारोती यांनी ही कामगिरी फत्ते केलीय. प्रेस क्लब आाफ इंडियाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पत्रकाराची निवड अध्यक्षपदी झालीय.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संगीता बरुआ पिशारोती यांचे पॅनेल पूर्ण बहुमताने निवडून आलेय. पीसीआयएलच्या जवळपास 68 वर्षांच्या इतिहासात त्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या आहेत. एक झुंजार व अभ्यासू पत्रकार म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांच्या नावाने भारतीय पत्रकारितेत एक महत्त्वाची नोंद लिहिली जाईल आणि ती म्हणजे देशातल्या पत्रकारितेची सर्वोच्च संस्था असलेल्या प्रेस क्लबमध्ये लिंगभेदाचे पुरुष वर्चस्ववादी अस्तित्व त्यांनी खऱ्या अर्थाने मोडून काढले. शिवाय पूर्वोत्तर भारतातील पहिल्या पत्रकार म्हणूनही त्यांनी पूर्वीच इतिहास रचलाय. ही निवड भारतीय पत्रकारितेतील महिलांच्या प्रतिनिधित्वासाठी महत्त्वाची मानली जाते.

संगीता बरुआ पिशारोती यांचा जन्म आसाममधील गोलाघाट येथे झाला. 1995 मध्ये त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. पूर्वोत्तर भारतातील सांस्कृतिक आणि राजकीय वातावरणात वाढलेल्या संगीता यांनी लहानपणापासूनच समाजातील मुद्दय़ांबद्दल जागरूकता दाखवली, जी नंतर त्यांच्या पत्रकारितेत प्रतिबिंबित झाली.

संगीता यांनी आपल्या पत्रकारितेची कारकीर्द 1996 मध्ये युनायटेड न्यूज ऑफ इंडिया (UNI) या वृत्तसंस्थेत सुरू केली. UNI च्या नवी दिल्ली मुख्यालयात काम करणाऱ्या पूर्वोत्तर भारतातील त्या पहिल्या महिला होत्या, ज्यायोगे त्यांनी मीडिया क्षेत्रातील जेंडर बेस्ड अपॉइंटमेंटच्या शिरस्त्याला मूठमाती दिली. आसाममधील माजुली बेटावरील मातीची धूप झाल्यामुळे होणाऱ्या उपजीविकेच्या नुकसानावर आधारित रिपोर्टिंग मालिकेसाठी 2011 मध्ये त्यांना सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीजची फेलोशिप मिळाली होती. त्यांच्या लेखनात पूर्वोत्तर भारतातील राजकारण, संस्कृती आणि सामाजिक मुद्दे नेहमीच प्रमुख असतात.

2017 मध्ये दिल्लीतील हिंदू-मुस्लिमांमधील, घरांच्या धार्मिक विभाजनावरच्या रिपोर्टिंगसाठी रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड त्यांना मिळालेलं. हा रिपोर्ताज विलक्षण गुंतागुंतीचा व काहीसा धोकादायक असूनही त्यांनी जिद्दीने पूर्णत्वास नेला. मुंबई आणि उपनगरात मराठी माणसांना घरे मिळत नसल्याच्या गोष्टी आपण नेहमीच करतो. मात्र संगीता बरुआ यांनी जसा रिपोर्ताज केला होता तशी कामगिरी आजवर कोणत्याही मराठी पत्रकारास का जमली नसेल हा प्रश्न अस्वस्थ करतो. संगीता बरुआ यांची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली ती त्यांच्या पुस्तकामुळे. `Assam : The Accord, The Discord` हे त्यांचे पहिले पुस्तक. जे आसाम करार, आसाम आंदोलन आणि बंडखोरी यावर आधारित आहे. या पुस्तकाचा पुढचा टप्पा असणारे `The Assamese: A Portrait of a Community` या पुस्तकात आसामच्या संस्कृती आणि समुदायावर अतिशय अभ्यासपूर्ण नोंदी आहेत, सखोल माहिती आहे. संगीता यांनी ‘द हिंदू’ या वृत्तपत्र, ‘द वायर’ डिजिटल माध्यमात डेप्युटी एडिटर/नॅशनल अफेअर्स एडिटर म्हणून उत्तर-पूर्व भारत, राजकारण आणि संस्कृतीवर लेखन केले आहे.

संगीता बरुआ यांच्या असाधारण कामगिरीचा उल्लेख करताना भवतालातील काही महिला पत्रकारांच्या कामगिरीचा गौरव करणे क्रमप्राप्त ठरते. डाफ्ने कारुआना गॅलेझिया या माल्टा देशातील निर्भीड पत्रकार, ज्यांनी पनामा पेपर्स या मोहिमेद्वारे भ्रष्टाचाराच्या गटारीत आकंठ बुडालेले राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी, मीडिया पर्सन्स, खेळाडू, समाजसेवी मंडळी अशा अनेकांचा बुरखा फाडला. आर्थिक घोटाळे उघडकीस आणण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सुचिता दलाल, राजकीय विश्लेषणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘द वायर’च्या वरिष्ठ संपादक आरफा खानम शेरवानी, गुजरात दंगलीचा खरा चेहरा उजागर करणाऱ्या राणा अयुब यादेखील लक्षवेधी पत्रकार आहेत. त्यांना आजवर अनेकदा धमक्या दिलेल्या असूनही त्या अद्यापही तितक्याच जोमाने सक्रिय आहेत.

अनेक महिला तसेच पुरुष पत्रकारांना प्रेरणा देणारी घटना संगीता बरुआ यांच्या निवडीमुळे घडली आहे. भारतीय पत्रकारिता पुन्हा एकदा ताठ कण्याने उभी राहील आणि सरकारी जबडय़ात अडकलेल्या लोकशाहीचे व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करेल अशी आशा ठेवायला हरकत नसावी.

[email protected]