
जंगलातून शेतशिवारात व नंतर थेट वस्तीत घुसणाऱ्या बिबटय़ांमुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये प्रचंड दहशत आहे. गेल्या दहा महिन्यांत वाघ व बिबटय़ांच्या हल्ल्यात 47 जणांचा बळी गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर बिबटय़ांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे पकडलेल्या बिबटय़ांची नसबंदी करण्याबरोबरच त्यांना गुजरातमध्ये अंबानींच्या वनतारामध्ये पाठवण्याचा वन विभागाचा प्रस्ताव आहे. टप्प्याटप्प्याने हे बिबटे वनतारात पाठवले जाणार असून हालचालींना वेग आला आहे.
मीरा-भाईंदरमधील एका सोसायटीत दोन दिवसांपूर्वी बिबटय़ा घुसल्यामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरी भागात हा प्रकार क्वचित घडत असला तरी राज्यातील गावागावांत बिबटय़ांनी दहशत माजवली आहे. पुण्यातील जुन्नर तालुका तसेच अहिल्यानगर, नाशिक, धुळे, सोलापूर, मराठवाडा व नागपूरच्या परिसरात बिबटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. वाघांचे हल्लेही वाढले आहेत. यात अनेकांना जीव गमवावा लागला असून लहान मुलांच्या मृत्यूंची संख्या चिंताजनक आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या मुद्दय़ावरून सर्वपक्षीय आमदारांनी आवाज उठवला होता. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू व अन्य सदस्यांनी बिबटय़ांच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडली होती. बिबटय़ांचा हल्ला ही राज्य आपत्ती म्हणून जाहीर करण्याची मागणी करण्यात आली, मात्र बिबटय़ांच्या हल्ल्यांचा प्रश्न अनुत्तरितच आहे. भाईंदरमधील घटनेने हेच अधोरेखित केले आहे.
एका बिबटय़ाला दररोज किमान अडीच किलो मांस खायला दिले जाते. त्यामुळे वन खात्याच्या खर्चातही वाढ होत आहे. त्यातच 50 पेक्षा जास्त बिबटे घेणार नसल्याचे वनताराने कळवल्याचे समजते. त्यामुळे इतर बिबटय़ांचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाच वर्षांत 377 बळी
वर्ष…. मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या
2021 ते 2022… 84
2022 ते 2023… 109
2023 ते 2024… 63
2024 ते 2025… 68
2025 ते आतापर्यंत… 53
पाळीव प्राण्याचा दर्जा द्या!
राज्यातील बिबटय़ांची संख्या दहा हजारांवर गेल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर बिबटय़ाला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या व बिबटय़ा पाळायला परवानगी द्या, अशी अजब मागणी आमदार रवी राणा यांनी केली होती. आमटे कुटुंबीयांनी बिबटे पाळले होते. अनेक घरात खतरनाक कुत्रे पाळले जातात. त्यामुळे आपण लहानपणापासून बिबटय़ाचे पालन केले तर बिबटे आणि माणसेही सुरक्षित राहतील, असे रवी राणा म्हणाले.
अहिल्यानगरमध्ये 23 बिबटे जेरबंद
बिबटय़ांना वनतारामध्ये स्थलांतरित करण्याची योजना आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत, मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. एकटय़ा अहिल्यानगर जिह्यात वन विभागाने मागील तीन-चार महिन्यांत 23 हून अधिक बिबटे पकडले आहेत.
































































