
शीव रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वे रुळांवर उभारलेला पादचारी पूल अंधारात आहे. या पुलावर दिव्यांची सोय नसल्याने चोरटय़ांनी तिथे आपला अड्डा बनवला आहे. त्यामुळे सायंकाळनंतर त्यावरून जाताना महिलांना सुरक्षेची चिंता वाटते. त्यामुळे या पुलावर विजेचे दिवे तातडीने लावण्यात यावेत, अशी मागणी धारावीतील सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा माने यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांच्याकडे केली आहे.
नीलिमा माने यांनी पालिका आयुक्तांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. शीव रेल्वे स्थानकाजवळील 111 वर्षे जुन्या पुलाचे पाडकाम सुरू आहे. त्यावरील वाहतूक गेल्या तीन-चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे शीव पश्चिम आणि पूर्वेस स्थानिक रहिवाशांना जाता यावे यासाठी त्या पुलाच्या बाजूला पादचारी पूल उभारला गेला आहे, परंतु त्या पुलावर विजेचे दिवे लावले गेलेले नाहीत. अंधाराचा फायदा घेऊन या पुलावर महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्र, सोनसाखळी खेचण्याच्या घटना घडल्या आहेत. पुरुषांनाही शस्त्राचा धाक दाखवून लुटले गेले आहे. या पादचारी पुलावरून रोज हजारो लोकांची ये-जा होत आहे. पुलावर छप्परही नसल्याने दिवसाही त्यावरून जाताना पादचाऱयांना उन्हाचा त्रास होतो, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

























































