अंधेरीत गॅस लिकेजमुळे घरात आगडोंब, एक गंभीर तर दोघे किरकोळ जखमी

धेरी पूर्वेकडील रमाबाई आंबेडकर नगरात आज पहाटे धक्कादायक घटना घडली. रात्री झोपल्यानंतर चुकून गॅस सिलिंडरचा नॉब सुरूच राहिल्याने गॅस गळती होऊन रात्रभर गॅस घरात पसरला. सकाळी महिलेने गॅस शेगडी सुरू करताच आगीचा भडका उडून त्यात ती महिला गंभीर होरपळली. तर घरात असलेले अन्य दोन वृद्ध देखील किरकोळ जखमी झाले. पहाटेच हा प्रकार घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रमाबाई आंबेडकर नगरात आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. आंबेडकर नगरातील एक तळ अधिक वरच्या मजल्याचे घर असून खालच्या घरात एका महिलेसह दोघे वृद्ध झोपले होते. तर वरच्या घरात दांपत्य व त्यांची मुलगी झोपली होती. सर्वजण झोपी गेल्यानंतर गॅस गळती होऊन खालच्या घरात गॅस पसरला. सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उठल्यावर महिलेने गॅस शेगडी सुरू करताच आगीचा भडका उडाला. त्यात ती महिला आगीत सापडल्याने त्यात ती जवळपास 60 टक्के होरपळली. तर त्यावेळी घरात असलेले अन्य दोन ज्येष्ठ नागरिक किरकोळ जखमी झाले. त्याचवेळी वरच्या घरात झोपलेल्या पती-पत्नी व त्यांच्या मुलीला सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सिलिंडर स्फोटाच्या वृत्ताने घबराट

आगीचा भडका उडाल्यानंतर त्या घरात सिलिंडरचा स्फोट झाल्याचे वृत्त आंबेडकर नगरात पसरले. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. आगीचे वृत्त कळताच एमआयडीसी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना इस्पितळात नेले. तसेच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. सिलिंडर स्फोट झाला नसल्याचे कळताच वातावरण निवळल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.