जोगेश्वरी टर्मिनसचा पहिला टप्पा जून 2026 मध्ये सुरू; दादर, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनसवरील गर्दी कमी होणार

पश्चिम रेल्वेवरील दीर्घकाळ रखडलेल्या जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचा पहिला टप्पा जून 2026 मध्ये प्रवासी सेवेसाठी सुरू करण्यात येणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनाचे उद्दिष्ट होते, परंतु कंत्राट आणि जागेसंबंधीच्या अडचणींमुळे प्रकल्प रखडला. आता कामाला गती देण्यात आली आहे. जोगेश्वरी टर्मिनस सुरू झाल्यानंतर दादर, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवरील गर्दीचा ताण कमी होणार आहे.

जोगेश्वरी टर्मिनस हे पश्चिम रेल्वेचे मुंबईतील चौथे रेल्वे टर्मिनस ठरणार आहे. प्रकल्पावर जवळपास 76.48 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जोगेश्वरी टर्मिनसचे काम मार्च 2027 पर्यंत पूर्णतः तयार होईल, अशी अपेक्षा पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी व्यक्त केली. जोगेश्वरीतील सहाय्यक टर्मिनल यार्डमध्ये टर्मिनसचे काम केले जात आहे. सध्या टर्मिनल यार्डचा वापर केवळ गाडय़ा उभ्या करण्यासाठी केला जातो. टर्मिनसचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या लांब पल्ल्याच्या रेल्वे जाळय़ामध्ये टर्मिनसचा समावेश केला जाईल. जोगेश्वरी टर्मिनसवरून दररोज 24 गाडय़ांची वाहतूक शक्य होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱयांनी स्पष्ट केले.

पहिल्या टप्प्यात प्रकल्पाची क्षमता

जोगेश्वरी टर्मिनसच्या पहिल्या टप्प्यांतर्गत पश्चिम रेल्वेने दोन प्रवासी प्लॅटफॉर्मसह एक पूर्ण विकसित कोचिंग टर्मिनल विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. एक प्लॅटफॉर्म स्थानकाच्या बाजूला आणि दुसरा प्लॅटफॉर्म दोन रुळांमध्ये उभारला जाणार आहे. एकाचवेळी तीन लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक हाताळता येतील. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक वेगवान बनण्याची चिन्हे आहेत.

दुसऱया टप्प्यात पिट लाइनचा समावेश

पश्चिम रेल्वेने 2024-25 च्या सर्वसमावेशक योजनेअंतर्गत जोगेश्वरी टर्मिनस प्रकल्पाच्या दुसऱया टप्प्यालाही मंजुरी दिली आहे. दुसऱया टप्प्यात एक अतिरिक्त प्रवासी प्लॅटफॉर्म, गाडय़ांच्या वाहतुकीसाठी दोन अतिरिक्त तसेच पिट लाइन आणि शंटिंग नेक यांसारख्या सहाय्यक पायाभूत सुविधांचा समावेश असेल, असे वरिष्ठ अधिकाऱयांनी स्पष्ट केले.