शिवसेना-मनसेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धुमधडाक्यात, वाजतगाजत केली जाईल! – संजय राऊत

दोन भावांची युती, मनोमिलन, एकत्रिकरण झालेले आहे. राजकीय युतीविषयी म्हणाल तर मुंबईसह नाशिक, कल्याण-डोंबिवली, ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या असून काही ठिकाणी चर्चा संपलेल्या आहेत. महानगरपालिका मोठ्या असून शेवटपर्यंत त्या यादीवर हात फिरवला जातो आणि त्या दृष्टीने काम सुरू आहे. 23 तारखेपासून अर्ज भरण्याची सुरुवात होत असून त्याच्याआधी 100 टक्के शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धुमधडाक्यात, वाजतगाजत केली जाईल, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, मी कालही सांगितले की, हा एक नवीन प्रयोग आहे. राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकत्रित निवडणुका लढत आहे. फक्त मुंबई नाही तर ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण डोंबिवली, नाशिकमध्ये दोन्ही बाजुच्या लोकांनी चर्चा पूर्ण केली असून त्याच्यावर आज दिवसभरात शेवटचा हात फिरवला जाईल.

हे नाटक हिट ठरेल का असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हे नाटक नाही. हा प्रितीसंगम आहे. महाराष्ट्राची जनता या प्रितीसंगमामध्ये सहभागी होत आहे. नाटक कुठले आहे, तर काल नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले ते नाटक आहे. चांगल्या नाटकाची तिकीटं ही तिकीट खिडकीवर संपतात आणि काही नाटकाची तिकीटं मालक स्वत: विकत घेऊन रिकामा थिएटरपुढे नाटकं करतो आणि आमचाच शो हाऊसफूल म्हणतो. पण कालचा शो हाऊसफूल अजिबात नव्हता. प्रचंड पैसे खर्च करून, तिकीटं विकत घेतली गेली, विकत दिली गेली. कालचा निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे.

कोट्यवधी रुपये नगरपालिका, नगरपंचायतीसाठी आतापर्यंत कुणी खर्च केले होते. हेलिकॉप्टर, चार्टर्ड फ्लाईट घेऊन कोण प्रचाराला गेले? आम्ही तरी कधी पाहिले नाही. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. पण या निवडणुकीमध्ये जुंपली कुणामध्ये, तर सत्ताधारी पक्षातील तीन गटात. भाजप विरुद्ध शिंदे गट, शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट. या तिघांनी प्रचंड पैशांची उधळपट्टी केली. कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र कोट्यवधी रुपये आले कुठून? कसे आले? वाटले गेले, पकडले गेले. काय केले निवडणूक आयोगाने? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

हर्षवर्धन सपकाळ म्हणतात ते 100 टक्के खरे आहे. निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाला जिंकण्यास मदत केली. त्यात चुकीचे काही नाही. तरीही आमचे कार्यकर्ते लढले. आमचे नेते गेले नाहीत, कारण आम्ही वर्षानुवर्ष ही निवडणूक कार्यकर्त्यांवर सोपवतो. नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून जर मिंधे म्हणत असतील असली कोण नकली कोण तर आमचे चोरलेले चिन्ह बाजुला ठेवा. अमित शहा यांनी दरोडा टाकून जे चिन्ह दिलंय ते बाजुला ठेवा आणि निवडणुकीला उतरा. मग असली कोण, नकली कोण याचा फैसला होईल. चोरलेला पक्ष, चोरलेल्या चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढता हे लक्षात घ्या. जो धनुष्यबाण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, घराघरात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी पोहोचवला, तो चोरून तुम्ही निवडणुका लढताहेत. तो बाजुला ठेवा एक निवडणूक, असे आव्हान संजय राऊत यांनी मिध्यांना दिले.