
आगामी ‘बॉर्डर २’ चित्रपटाची चर्चा ही फार रंगली आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, बॉर्डर २ हा सनी देओलच्या १९९७ च्या बॉर्डर चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केलेले आहे. चित्रपटात सनी देओल व्यतिरिक्त, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे कलाकार दिसणार आहेत.
परंतु मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात अक्षय खन्ना, सुनील शेट्टी आणि सुदेश बेरी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. त्यांच्या या चित्रपटामध्ये विशेष भूमिका असणार आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागात तिन्ही कलाकार दिसले होते.
मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी आणि सुदेश बेरी चित्रपटामध्ये खात्रीलायक दिसणार आहेत. हा चित्रपट १९७१ च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. निर्मात्यांना पुन्हा येणाऱ्या भागामध्ये पहिल्या भागातील अभिनेत्यांना आणायचे आहे. म्हणूनच त्या अनुषंगाने आगामी दुसऱ्या भागात कथानकामध्येही बदल सुरु केलेले आहेत.
नोव्हेंबरमध्ये अक्षय आणि सुदेश बेरीचे शूटींग हे मुंबईत पूर्ण झाले असून, सुनील शेट्टी हा एका दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचे समजते. त्यामुळे त्याचे शूटींग हे वेगळे करण्यात आले होते. आगामी भागासाठी अक्षय, सुनील तसेच सुदेश हे तिन्ही कलाकार आपल्याला त्यांच्या तरुणवयात दिसणार आहेत.
बॉर्डर २ हा चित्रपट येत्या २३ जानेवारी २०२६ ला प्रदर्शित होणार आहे. सध्याच्या घडीला चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये सनी देओलचे दमदार संवाद आहेत. दिलजीत दोसांझ, वरुण धवन आणि अहान शेट्टी प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.
यामध्ये वरुण परमवीर चक्र पुरस्कार विजेते मेजर होशियार सिंग दहियाची भूमिका साकारत आहेत. दिलजीत दोसांझ निर्मल जीत सिंगची भूमिका साकारणार आहेत. अहान शेट्टी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

























































