
लाडकी बहीण योजनेतील रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ हजार लाडक्या बहिणींची नावे छाननीनंतर कमी करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. लाडक्या बहिणींना गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचा हप्ता अजूनही मिळालेला नाही.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. मात्र सत्तेवर येताच या योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी किंवा छाननी करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी सक्तीची करण्यात आली. केवायसीनंतर लाडकी बहीण योजनेतून अनेक महिला अपात्र ठरत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता तब्बल ४७ हजार नावे कमी झाली आहेत. त्यांनी या योजनेचा चुकीची माहिती देऊन गैरफायदा घेतल्याचे पुढे आले आहे. ज्यांच्याकडे चारचाकी, सरकारी नोकरी किंवा वयोमर्यादा ओलांडली आहे, प्राप्तिकर भरला आहे अशा बहिणींची नावे आता यादीतून वगळण्यात आली आहे.
या योजनेसाठी जिल्ह्यातून जवळपास ४ लाख २० हजार ४४० लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. चौकशी आणि छाननीनंतर त्यातील ४६ हजार ९६३ लाभार्थी निकषात बसत नसल्याने कमी करण्यात आले आहेत. दरम्यान, ५३ बहिणींनी छाननीनंतर स्वतःहून या योजनेचा लाभ आपल्याला नको, असे कळवले आहे. आता केवायसी अनिवार्य करण्यात आल्याने आणखी काही नावे रद्द होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात या योजनेच्या ३ लाख ७७ हजार ४७७ महिला लाभार्थी आहेत.


























































