
तीन कसोटी सामन्यांची मालिका जिंकत न्यूझीलंडने जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत मोठी झेप घेत थेट दुसरे स्थान पटकावले आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या मालिका विजयामुळे किवी संघाने गुणटक्केवारीत लक्षणीय सुधारणा करत आपली दावेदारी अधिक मजबूत केली, तर दुसरीकडे या निकालाचा फटका हिंदुस्थानी संघाला बसला असून ते सहाव्या स्थानावर घसरले आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे आणि सलग तिसऱयांदा त्यांनी अंतिम फेरीत धडक मारण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.
माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर झालेल्या तिसऱया कसोटीत न्यूझीलंडने वेस्ट इंडीजवर 323 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह किवींनी तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली. मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता, तर दुसऱया कसोटीतही न्यूझीलंडने नऊ विकेट राखून विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले होते.
या मालिका विजयामुळे न्यूझीलंडचे गुण आणि गुणटक्का वाढला असून संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत दुसऱया स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने मात्र अव्वल स्थान कायम राखले आहे. दुसरीकडे, हिंदुस्थानने या चक्रात सर्वाधिक कसोटी सामने खेळूनही अपेक्षित सातत्य दाखवता न आल्याने संघाचा गुणटक्का घसरला असून त्याचा थेट फटका क्रमवारीत बसला आहे
2027 मध्ये होणाऱया जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी गुणतालिकेतील अव्वल दोन संघांनाच पात्रता मिळणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा हा मालिका विजय अंतिम फेरीच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल ठरू शकते. दुसरीकडे हिंदुस्थानसाठी पुढील कसोटी सामने ‘करो किंवा मरो’ असे आतापासूनच बनले आहेत.

























































