
जिह्यातील 12 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निकालानंतर भाजपात सन्नाटा पसरला असून, 12 जागा लढवून 4 जागा पदरात पाडून घेणाऱ्या भाजपमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हटावच्या मागणीला जोर वाढला आहे. दरम्यान, अक्कलकोट तालुक्यात दुधणीत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पुतण्या प्रथमेश म्हेत्रेला, तर अक्कलकोटमध्ये भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बंधू मिलन कल्याणशेट्टी यांना निवडून आणण्याच्या रणनीतीत यश मिळविल्याने दोघांतील टायपची चर्चा रंगली आहे. कारण दुधनीत भाजपाचा, तर अक्कलकोटमध्ये शिंदे गटाचा दारुण पराभव झाला आहे.
सोलापूर जिह्यात जयकुमार गोरे यांच्याकडे पालकमंत्रिपद आल्यापासून प्रत्येक पक्ष फोडत त्यांनी आयारामची संख्या वाढविली होती. भाजपातील दोन ज्येष्ठ आमदार, माजी मंत्री विजय देशमुख आणि सुभाष देशमुख यांना डावलत बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर छुपी आघाडी करून सत्ता मिळविली. त्यामुळे पालकमंत्री गोरेंच्या विरोधात नाराजीची सुप्त लाट धगधगत होती. अशातच काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशावरून ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांच्याशी पंगा घेतल्याने पालकमंत्री ‘गोरे हटाव’ची बीजे पेरली गेली. नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या 12 जागा लढविण्याची घोषणा केली. परंतु त्यांनी ‘ऑपरेशन लोटस’च्या नावाखाली सुरू केलेला हा प्रयोग अवघ्या चार जागांवर येऊन ठेपल्याने प्रचंड नाराजी पसरली आहे.
विशेषकरून अक्कलकोटमध्ये म्हेत्रे आणि कल्याणशेट्टी यांच्यातील टायपची चर्चा चांगली चर्चिली जात असून, या दोन्ही आजी-माजी आमदारांनी नगराध्यक्षपद आपल्या कुटुंबातच सुरक्षित ठेवले आहे. सोलापूर जिह्यात भाजपने साम-दाम-दंड-भेद वापरून ही 12 पैकी चार नगराध्यक्षपदे मिळवल्याने हा पराभव भाजपाच्या वर्मी तर लागला आहेच; परंतु पालकमंत्री ‘गोरे हटाव’च्या मागणीला ऐन पालिका निवडणुकीत बळ मिळाले आहे.


























































