पुणे, धाराशिवचे सातत्यपूर्ण जेतेपद; पुरुष गटात पुण्याची हॅट्ट्रिक, महिलांमध्ये धाराशिवने विजेतेपद राखले

पुण्याचे 61 व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत दुहेरी जेतेपद अवघ्या 2 गुणांनी हुकले. पुरुष गटात सलग तिसऱयांदा बाजी मारताना पुण्याने आपला दबदबा राखला, तर महिला गटातही पुणे जेतेपदासमीप पोहोचले होते. मात्र अखेरच्या क्षणी धाराशिवच्या मुलींनी पुण्याला रोखत अजिंक्यपद पटकावत आपले जेतेपदही राखले. या स्पर्धेत पुण्याचा शुभम थोरात आणि धाराशिवची अश्विनी शिंदे अष्टपैलू खेळाडू ठरले.

महिलांचा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. जेतेपदासाठी उभय संघात शेवटच्या सेपंदापर्यंत संघर्ष रंगला. अखेर धाराशिवने पुण्यावर 28-26 असा 2 गुणांनी निसटता विजय मिळवत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. सामन्यात दोन्ही संघांना ड्रीम रनचे प्रत्येकी 4 गुण मिळाले. धाराशिवकडून मैथिली पवार, अश्विनी शिंदे, संध्या सुरवसे (1.50 मि. संरक्षण व 4 गुण), संपदा मोरे, सुहानी धोत्रे यांनी संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पुण्याकडून प्रियांका इंगळे, कोमल धारवाटकर, श्वेता नवले, भाग्यश्री बडे यांनी झुंजार खेळ करत सामना शेवटपर्यंत रंगतदार ठेवला.

पुरुषांच्या अंतिम सामन्यातही कांटे की टक्कर झाली. मध्यंतराला दोन्ही संघ 16-16 अशा बरोबरीत होते. मात्र अखेरच्या क्षणी पुण्याने संयम राखत मुंबई उपनगरवर 34-32 असा 2 गुणांनी निसटता विजय मिळवून अजिंक्यपदाची हॅट्ट्रिक साकारली. पुण्याकडून शुभम थोरात, सुयश गरगटे, रविकिरण कचवे (6 गुण), प्रतीक वाईकर यांनी निर्णायक कामगिरी केली. मुंबई उपनगरकडून अनिकेत चेंदवणकर व निहार दुबळे, धीरज भावे यांनी प्रभावी खेळ करत शेवटपर्यंत झुंज दिली.

वैयक्तिक पुरस्कार विजेते

राजे संभाजी पुरस्कार (अष्टपैलू खेळाडू) : शुभम थोरात (पुणे), उत्कृष्ट संरक्षक : अनिकेत चेंदवणकर (मुंबई उपनगर), उत्कृष्ट आक्रमक : सुयश गरगटे (पुणे) अहिल्या पुरस्कार (अष्टपैलू खेळाडू) : अश्विनी शिंदे (धाराशिव), उत्कृष्ट संरक्षक : प्रियांका इंगळे (पुणे), उत्कृष्ट आक्रमक : मैत्री पवार (धाराशिव).