
टीम इंडियाची संघ निवड जाहीर होताच एकच प्रश्न हवेत घुमला… हे खरंच घडलंय का? टी-20 विश्वचषकापूर्वी हिंदुस्थानी संघातून उपकर्णधार शुभमन गिलला वगळण्याचा धक्कादायक निर्णय घेतल्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली. या निर्णयाने माजी कर्णधार आणि माजी निवड समिती अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
श्रीकांत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, उपकर्णधारपद दिलेल्या खेळाडूला मोठय़ा स्पर्धेआधी बाहेर ठेवणं क्वचितच पाहायला मिळतं. मात्र, तरीही अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने भावनांपेक्षा कामगिरी आणि संघसमतोलाला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांनी निवड समितीचे कौतुक केले. गिलचा टी-20 आंतरराष्ट्रीय स्ट्राइक रेट अपेक्षेइतका प्रभावी नसल्याने त्यांची निवड अडचणीत आली. याउलट अभिषेक शर्मा व संजू सॅमसन यांची आक्रमक जोडी संघाला अधिक साजेशी ठरत असल्याचे मत श्रीकांत यांनी मांडले. गिलची गुणवत्ता निर्विवाद असली तरी, त्याला आगामी टी-20 मध्ये अधिक प्रभाव दाखवावा लागेल, हेही त्यांनी ठामपणे सांगितले.


























































