संस्कृती जमीन-पाण्याशी संबंधित आहे, म्हणूनच तपोवन टिकायला हवे; डॉ. तारा भवाळकर यांची आग्रही भूमिका

जगभरातील प्राचीन कथा या सृष्टी निर्मितीच्याच आहेत, संस्कृती ही नेहमी जमीन आणि पाण्याशी संबंधित आहे, म्हणूनच नाशिकचे तपोवन टिकायला हवे, अशी आग्रही भूमिका 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी मांडली.

सार्वजनिक वाचनालय, नाशिक संस्थेच्या ग्रंथालय महोत्सवाची सुरुवात शनिवारी सायंकाळी मु. शं. औरंगाबादकर सभागृहात डॉ. तारा भवाळकर यांच्या मुलाखतीने झाली. मुळा-मुठा, गोदावरी, कृष्णेच्या सुपिक प्रदेशांनी मला आंतरिकदृष्टय़ा समृद्ध केले, ग्रंथालयांनी साथ दिली, अशी प्रांजळ भावना त्यांनी व्यक्त केली. पत्रकार फणिंद्र मंडलिक यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.

नाटक ही माझी अभिरूची आहे. मात्र तुम्ही सर्वांनी मला लोकसंस्कृतीत अडकवून ठेवले. माझा पहिला निबंध नाटकावर होता, प्रथम एकांकिकेचंच लेखन केलं, एवढंच काय संशोधनपर पुस्तक व प्रबंधही नाटकाशी संबंधित होता, असे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी भाषा आणि लिपीचे नाते लक्षात आणून दिले. एका भाषेतून दुसऱ्या भाषेकडे वळताना लिपी आकलन महत्त्वाचे ठरते, हे अनुभवावरून सांगितले. भाषेविषयी त्या म्हणाल्या की, भाषा केवळ लेखनातून येत नाही, तर बोलण्यातून, त्यातील आरोह, अवरोहातून समृद्ध होत जाते. आंतरज्ञानशाखीय विद्यापद्धतीला महत्त्व दिले पाहिजे, या बहुस्पर्शी अभ्यासपद्धतीचे भान आजच्या शिक्षकांना यायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकसंस्कृतीत नाही तर उच्चभ्रू वर्गातच अंधश्रद्धा अधिक आहे, असे सांगताना त्यांनी संत, जात्यावरील ओव्या गाणाऱ्या महिलांचे थोरपण, विवेकीपण मांडले. आपण आजकालची माणसे पदवीधर असतो पण शहाणे असतोच असे नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. सावाना अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

शुद्ध भाषेवरून आपण उगाच भांडतो

शुद्ध मराठी भाषा कोणती यावरून आपण मराठी माणसं उगाच भांडतो. 15 टक्के लोक बोलतात ती भाषा शुद्ध आणि 85 टक्के लोक बोलतात ती अशुद्ध हे का ठरवायचे? भाषा बदलण्याला काळ, भौगोलिक अंतर आणि हवामान हे घटक कारणीभूत ठरत असतात, असे तारा भवाळकर या वेळी म्हणाल्या.