उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने 100 चा आकडा 100 टक्के पार करणार, संजय राऊत यांचा विश्वास

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीबाबत ठाम भूमिका मांडली. “कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली आहे. शिवसेना आणि मनसे यांच्यातील युतीविषयी कोणाच्याही मनात संभ्रम नाही. कार्यकर्त्यांच्या मनात तर अजिबात नाही. मुंबईसह अनेक महानगरपालिकांमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन काम करत आहेत. दोन्ही पक्षांकडून सूचना गेलेल्या आहेतच, पण त्याआधीच कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आणि मनोमिलन झालं आहे, ते आम्ही स्वतः अनुभवतोय,” अशी थेट भूमिका त्यांनी मांडली.

संजय राऊत म्हणाले की, “शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती झालेलीच आहे. जागावाटपाचा शेवटचा टप्पा काल रात्री पूर्ण झाला. आता राज साहेब आणि उद्धवजी एकत्र येऊन जागावाटपाचा फॉर्म्युला आणि इतर बाबींवर घोषणा करणार आहेत. ती आज संध्याकाळी करायची की उद्या, याचा निर्णय थोड्याच वेळात होईल. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळे आता वेगाने काम करावं लागत आहे,” असे ते म्हणाले.

“नाशिकमध्ये चर्चा आटोपली आहे, पुण्यात विषय संपलेला आहे, कल्याण-डोंबिवलीचा विषय संपलेला आहे, ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्येही जागावाटपाचा प्रश्न आम्ही संपवलेला आहे. सात-आठ महानगरपालिकांचा विषय एकत्र हाताळताना थोडा वेळ लागतो. मुंबई महानगरपालिकेबाबत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्याव्या लागतात. काही ठिकाणी विद्यमान नगरसेवकांच्या जागांची अदलाबदल करावी लागते, त्यासाठी लोकांना एकत्र बसवून मार्ग काढावा लागतो. या सगळ्या प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत,” असे त्यांनी सांगितले.

“देशात जी परिस्थिती आहे, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये ज्या पद्धतीने निकाल लावले गेले, ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटला जातो, निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत घटनात्मक संस्था भाजपसारख्या नेत्यांच्या पायाखाली चिरडल्या जात आहेत, त्यावर आता बोललो नाही तर उशीर होईल. मरताना भावना व्यक्त करण्यापेक्षा आम्ही जिवंतपणी लढतोय. आम्ही मुडदे नाही आहोत. जिवंत माणसं पाच वर्षं वाट पाहत बसत नाहीत. हा देश मुडद्यांचा नाही, जिवंत माणसांचा आहे. महाराष्ट्र जिवंत माणसांचा आहे,” असेही ते म्हणाले.

“जागावाटप पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही युती जाहीर होत नाही. मग शिंदे गट आणि भाजपची युती जाहीर का होत नाही? अजित पवार आणि भाजपमध्ये युती अद्याप का जाहीर झालेली नाही? आमच्याकडे सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. आम्ही दोन्ही पक्ष मनापासून एकत्र आहोत. जागावाटपावर कुठेही ताणतणाव, रस्सीखेच किंवा भांडण नाही. कुणी कुठल्या जागेसाठी आडून बसलेलं नाही. आमच्यातून बाहेर गेलेले किंवा आमच्याकडे आलेले सगळे शेवटी युतीतच राहणार आहेत,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

“जागावाटप अत्यंत फेअर पद्धतीने झालं आहे. अनेक जागांवर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हक्क सांगतात, ते चुकीचं नाही. मनसेने एखादी जागा मागितली तर त्यात गैर काहीच नाही, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हक्क सांगितला तरी गैर काहीच नाही. मोठा पक्ष असताना जागावाटपात अडचणी येतात. सगळ्यात जास्त अडचणी भाजपलाच येणार आहेत. पण आमच्यात आणि मनसेमध्ये जागावाटपावरून कोणताही विसंवाद नाही. जागा कुणाकडे राहते यापेक्षा मराठी माणसाच्या नीतीतून ती जिंकून येणं महत्त्वाचं आहे,” असे ते म्हणाले.

“ज्या दिवशी वरळीच्या डोममध्ये दोन भाऊ एकत्र आले, त्याच दिवशी युतीची घोषणा झाली होती. आमचं जागावाटप आणि तिकीट वाटप पूर्ण झालेलं आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांची उमेदवारी कापून गद्दारांना जागा देण्याइतकी वाईट वेळ शिवसेनेवर आलेली नाही. बंड कुठे होत नाही, पण या वेळी शिवसेना-मनसे युतीत तसं काही घडेल असं वाटत नाही,” अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

“काँग्रेसचा विषय सध्या बंद आहे. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू की कुठेही कटुता न ठेवता मुंबईत लढू. निवडणूक निकालानंतर मुंबईच्या रक्षणासाठी एकमेकांना कशी मदत करता येईल, यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली आहे. निकालानंतर परिस्थिती निर्माण झाली आणि काँग्रेसची मदत लागली, तर ती घेतली जाईल. काँग्रेसची लढाईही राष्ट्रद्रोही, जातीयवादी, धर्मांध आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या प्रवृत्तीविरोधातच आहे. शिवसेना-मनसे युती आणि राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आलेले असताना आम्ही 100 चा आकडा 100 टक्के पार करतो,” असे ते म्हणाले.

“महाविकास आघाडी तुटलेली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि डावे पक्ष अजूनही एकत्र आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वेगळे निर्णय घ्यावे लागतात. कोकणाला रासायनिक डंपिंग ग्राउंड बनवलं जात आहे, हे चुकीचं आहे. सगळ्या जगातून हद्दपार झालेले रासायनिक प्रकल्प कोकणात आणले जात आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली.

“सुधीर मुनगंटीवार हे मूळ भाजपचे, शंभर नंबरी सोन्यासारखे कार्यकर्ते आहेत. पक्षासाठी आयुष्य वेचलेलं, संघर्ष केलेला, तुरुंगवास भोगलेला कार्यकर्ता जेव्हा वेदना व्यक्त करतो, तेव्हा त्या वेदना समजून घ्यायला हव्यात. बाहेरून आलेल्या लोकांनी पक्ष ताब्यात घेतल्याची भावना ही एका सच्च्या कार्यकर्त्याची वेदना असते,” अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.