
महिला प्रीमियर लीग 2026 चे वारे आतापासूनच वाहायला सुरुवात झाली आहे. नववर्षावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. अवघ्या काही दिवसांवर स्पर्धा येऊन ठेपली आहे. अशातच दिल्ली कॅपिटल्सने मोठा डाव टाकत वर्ल्ड कप विजेत्या जेमिमा रोड्रिग्जवर कर्णधारपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. मागील तीन हंगामात ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मॅग लॅनिंगने दिल्लीचे कर्णधारपद भुषविले. मात्र, आगामी हंगामासाठी 25 वर्षीय जेमिमा दिल्लीचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
जेमिमाने दिल्लीकडून खेळताना आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. WPL मध्ये दिल्लीकडून खेळताना तिने 27 सामन्यांमध्ये 139.66 च्या स्ट्राईक रेटने 507 धावा चोपून काढल्या आहेत. तसेच सध्या ती चांगल्या फॉर्मात सुद्धा आहे. वनडे वर्ल्ड कप 2025 च्या सेमीफायनलमध्ये तीने ऑस्ट्रेलियाचा पाणी पाजलं होतं. तिने ठोकलेल्या शतकामुळे टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली होती. तसेच सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात तिची बॅट तळपली आणि तिने 69 धावा केल्या. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला नवीन कर्णधार जेमिमाकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत.





























































