
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक नियमात ग्रामविकास विभागाने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार यापुढे ईव्हीएम मशीनच्या बॅलेट युनीटवर राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराची नावे पहिली असतील, त्यानंतर प्रादेशिक पक्ष आणि शेवटी अपक्ष उमेदवार असा क्रम असणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत या आधी उमेदवाराच्या आडनावाच्या अद्याक्षरानुसार बॅलेट युनीटवर नावे असायची. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांची नावे खाली जायची. नव्या नियमानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या ज्या पक्षानी राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली आहे, अशा मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांची नावे बॅलेट यनिटवर सर्व प्रथम असतील. त्यानंतर महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांची नावे असतील.
बॅलेट युनिटवर राष्ट्रीय व महाराष्ट्रातील प्रादेश पक्षांच्या नंतर इतर राज्यांमधील ज्या प्रादेशिक पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली असेल अशा उमेदवारांची नावे असतील. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेल्या अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा क्रम असेल़ सर्वात शेवटी अपक्ष उमेदवारांची नावे असणार आहेत. हे नियम तातडीने लागू करण्यात आल्याने आगामी निवडणुकांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.
पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवारांची यादी कशी मांडायची याबाबत स्पष्ट आणि एकसंध पद्धत नव्हती. नव्या सुधारणेनुसार, निवडणूक चिन्ह वाटपानंतर उमेदवारांची यादी ठरावीक चार गटांमध्ये विभागून प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे नियम तातडीने लागू करण्यात आल्याने आगामी पंचायत समिती निवडणुकांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.
उमेदवारांचे चार गट निश्चित
- मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार
- इतर राज्यांतील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार
- राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पण अमान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार
- अपक्ष उमेदवार
मराठी वर्णानुक्रमाने नावे
उमेदवारांची नावे मराठी वर्णानुक्रमानुसार असतील. उमेदवारांचे आडनाव, त्यानंतर नाव आणि पत्ता या क्रमाने माहिती दिली जाणार आहे. यामुळे नावाच्या क्रमावरून होणारे संभाव्य संभ्रम, तक्रारी आणि वाद टाळता येण्याची शक्यता आहे.
























































