मुंबई पालिकेत महाविकास आघाडी म्हणून लढावे! – सुप्रिया सुळे

मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची चर्चा सुरू आहे. तरीही उद्धव ठाकरे व राज ठाकरे आणि काँग्रेससह महाविकास आघाडी म्हणून लढले पाहिजे. मतांचे विभाजन होऊ नये म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मांडली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सुळे म्हणाल्या, पुण्यात अजित पवारांकडील काही पदाधिकारी आणि आमच्याकडील काही पदाधिकाऱयांची चर्चा सुरू आहे. मात्र पुण्यात स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पक्ष कोणताही निर्णय घेणार नाही.  पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत अजित पवार यांच्याशी युती करण्याबाबत कोणताही अधिकृत प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही.

पुणेकर हाच केंद्रबिंदू

आमचा पक्ष हा लोकशाही पद्धतीने चालतो. त्यामुळे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पक्ष कोणताही निर्णय घेणार नाही. पुण्यातील पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांच्याशी सोमवारी माझी दोन तास चर्चा झाली. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा असल्याने जगताप नाराज आहेत किंवा कसे याविषयी आपल्याला माहिती नाही, असेही सुळे यांनी स्पष्ट केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आघाडीबाबत वेगवेगळय़ा चर्चा सुरू आहेत. पण जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत त्यावर बोलणे योग्य नाही. या निवडणुकीत कार्यकर्ता केंद्रबिंदू ठेवून, पुणेकर हा केंद्रबिंदू ठेवूनच पक्ष निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.