भाजपच्या नवनीत राणा म्हणतात, हिंदूंनी तीन ते चार मुलं जन्माला घालावीत

हिंदुस्थानला पाकिस्तान बनवायचा आहे. त्यासाठी मुस्लिम लोक मोठय़ा संख्येने मुले जन्माला घालत आहे. तर मग हिंदूंनी एका मुलावर संतुष्ट का व्हावे? हिंदूंनीदेखील किमान चार मुले जन्माला घातली पाहिजेत, असे वादग्रस्त विधान भाजप नेत्या, माजी खासदार नवनीत राणा यांनी केले आहे.

महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या नवनीत राणा यांनी अजब तर्कट मांडत नव्या वादाला तोंड फोडले आहे. नवनीत राणा म्हणाल्या, एक मौलाना आहे तो म्हणाला की, मला चार बायका आणि 19 मुले आहेत. तो म्हणतो की मला 30-35 मुले पाहिजे होती. तो कोरम मी पूर्ण करू शकलो नाही याची लाज वाटते. ते जर खुल्यापणे चार बायका 30-35 मुले पाहिजे असे म्हणत असतील, तर आपल्या हिंदू लोकांनी किमान तीन ते चार मुले जन्माला घातली पाहिजेत, असे राणा यांनी म्हटले आहे.

मी सगळ्या हिंदू लोकांना सांगते की जर ते खुलेपणे सांगत असतील की 4 बायका आणि 19 मुले आहेत तर आपण किमान तीन ते चार मुले जन्माला घातली पाहिजेत. त्यांचा विचार आपल्या हिंदुस्थानला पाकिस्तान बनवायचा आहे. त्यासाठी ते मोठय़ा संख्येने मुलं जन्माला घालत आहेत, तर मग आपण एका मुलावर का संतुष्ट राहतो? आपणही तीन ते चार मुले जन्माला घातली पाहिजेत, असे राणा म्हणाल्या.