
गोमंतकातील कवी, नट, नाटककार, नाटय़ेतिहासाच्या साधनसामग्रीचे संग्राहक दिवंगत सीताराम मणेरकर यांनी रचलेले ‘श्रीमद् भगवद्गीता संगीतामृत’ हे महाकाव्य नाटय़पद रचनेतील चमत्कारच आहे, असे गौरवोद्गार पं. अजित कडकडे यांनी काढले.
बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे लघु नाटय़गृहात झालेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ात ते बोलत होते. ‘श्रीमद् भगवद्गीता या ग्रंथाचा जगातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे, परंतु रामायणाचे जसे मराठीत गीत रामायण झाले तसे गीतेचे मराठी काव्य रूपांतर झालेले माझ्या तरी वाचनात नाही. मेघदूताचा समश्लोकी अनुवाद अनेकांनी केलेला आहे, परंतु गीतेचा समश्लोकी अनुवाद झाल्याचे आढळत नाही. संगीत नाटकातील नाटय़पदांच्या चालीवर गीतेचा अनुवाद करणे म्हणजे अभिनव आणि स्तुत्य कार्य आहे. यातील माहीत असलेली पदे गाऊन पाहिल्यावर मणेरकर यांचे भाषा प्रभुत्व, संगीताचे ज्ञान पाहून मी अवाक झालो, असे ते म्हणाले.
यावेळी विदुषी अर्चना कान्हेरे यांनी या पुस्तकातील पदांचे गायन केले. यावेळी मीना पाटील, स्नेहा माणगावकर आणि सुनंद मणेरकर उपस्थित होते.



























































