
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र निवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा आज होणार आहे. या संदर्भात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. मुंबई मराठी माणसाची हाच सगळ्यात मोठा अजेंडा, हाच वचननामा असल्याचे राऊत यावेळी म्हटले.
मुंबई मराठी माणसाची याच्यापेक्षा वेगळा वचननामा असू शकत नाही. भाजप, मिंधे गट आणि अदानींच्या पवित्र हस्ते मुंबईची जी लूट सुरू आहे हे थांबवणे हा अजेंडा असू शकत नाही? मुंबईवर मराठी माणसाचा पहिला हक्क आहे. मुंबई मराठी माणसाची आहे, हा अजेंडा असू शकत नाही? या अजेंड्यावरच आम्ही बाळासाहेबांच्या काळापासूपासून ते आतापर्यंत निवडणुका लढलो. बाकी आम्ही महापालिकेच्या माध्यमातून काम केले त्याचे प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे यांनी केले आहे. कोस्टर रोडचे श्रेय कुणी घेऊ द्या, पण त्याची पायाभरणी कुणी केली? उद्धव ठाकरे यांनी केली, असेही संजय राऊत म्हणाले.
मेरीटवर जागावाटप
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच्या युतीबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच काय काँग्रेस पक्षानेही आमच्या बरोबर असावे अशी आमची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, शरद पवार याच्यामध्ये लक्ष घालत आहेत. युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये प्रत्येकाच्या मनासारखे होत नाही. काही ठिकाणी त्याग करावा लागतो आणि माणसांच्या प्रेमात न पडता जागावाटप करायचे असते. आपण माणसांच्या प्रेमात पडलो तर जागावाटप अडचणीचे ठरते. जिंकेल त्याची जागा, मेरीटवर, गुणवत्तेवर हे आमचे धोरण आहे आणि ते आम्ही शिवसेना-मनसेमध्ये राबवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमचेच सरकारी आहेत. काही ठिकाणी मुंबईच्या बाहेर काँग्रेस आहे. आम्ही हे धोरण ठेऊ की गुणवत्तेच्या आधारावर, मेरीटवर जागावाटप होईल. राष्ट्रवादीसोबतच्या चर्चा यशस्वी होतील. आमची चर्चा सुरू असून आम्ही मार्ग काढू, असे राऊत म्हणाले.
नाटकं सुरू झालीत
मुंबईत बटोगे तो पिटोगे अशी बॅनर लागली आहेत. उत्तर भाषिकांना, हिंदी भाषिकांना अस्वस्थ करण्याचे काम भाजप, शिंदे गटाचे आहे. त्यांना कुणीही मारलेले नाही. मी मुंबईकर हा नारा उद्धव ठाकरे यांनीच दिला होता. पण मराठी माणसाच्या एकजुटीमुळे काही लोकांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे, ते अशा प्रकारे दुहीचे राजकारण करत आहेत. मला एक तरी उदाहरण दाखवावे पोस्टर लावणाऱ्याने की शिवसेनेने कुणालाही इथे विनाकारण मारले, हल्ला केला. अनेकदा उत्तर प्रदेश, बिहारमध्ये मराठी लोकांवर हल्ले झालेत. कर्नाटकात सीमाभागात आमच्या लोकांवर हल्ले होत आहेत. त्याच्यावर कुणाला दु:ख नाही. बेळगावात गेल्या दोन वर्षात मराठी माणसांवर 212 निर्घृण हल्ले झाले आहेत. मराठीचा झेंडा फडकावला म्हणून तुरुंगात टाकले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी एकदा तरी निषेध केलाय का? बेळगावात मराठी म्हणून जगायचे, मराठी भाषा हवी म्हणून अन्याय, अत्याचार होताहेत आणि इथे उत्तर भारतींना बटोगे तो पिटोगे चालले आहे. आधी लोकसभा, विधानसभेला बटेंगे ते कटेंगे होते, आता त्यांची वेगवेगळे नाटकं सुरू आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
हे हिंदुत्वाचे, मराठी माणसाचे भक्षक!
भाजपचे आमदार पराग शहा यांनी मराठी रिक्षावाल्याला मुंबईत मारले, हे तुम्हाला दिसत नाही? एका मराठी रिक्षावाल्याला भर रस्त्यावर मारून दादागिरी केली. का? कारणं काही असतील, पण मराठी माणसावर भाजपच्या आमदाराने हात उचलला याच्यावर तुम्ही प्रश्न का विचारत नाही? तुम्ही मराठी आहात ना सगळे. तुमच्या हृदयाला टोचत नाही का? एका मराठी गरीब रिक्षावाल्याला, चुकला असेल तर म्हणून भर रस्त्यात असे मारण्याचा अधिकार भाजप आमदाराला कुणी दिला? असा सवाल तर राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की, मी परप्रांतीय शब्द वापरत नाही, मी मुंबईकर म्हणतो. जे मतदार आहेत, त्यांना शिवसेनेने गेल्या 50-55 वर्षात अनेक सोयी सुविधा दिल्या. त्यांचे रक्षण केले. भाजप 1992 साली शेपूट घालून बसले होते. तेव्हा आमचे पोरं तलवारी, बंदुका, बॉम्ब घेऊन बाहेर पडले होते. कुठे होते भाजपवाले? आता मोठे हिंदुत्वाचे रक्षक म्हणून मिरवत आहेत. हे हिंदुत्वाचे, मराठी माणसाचे भक्षक आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला.


























































