महाविकास आघाडी आणि अजित पवार गटाला सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा प्रयत्न, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याचा निर्णय शरद पवारच घेतील

महाविकास आघाडी आणि अजित पवार गटाला बरोबर घेऊन महापालिका निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. पक्षामध्ये काही नेत्यांची मते भिन्न असली तरी, राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर युतीबाबत पक्षप्रमुख शरद पवार जो निर्णय घेतील, तो अंतिम आणि मान्य असेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मांडली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी बुधकारी पक्ष कार्यालयास भेट देत निवडणूक नियोजनावर इच्छुक उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांची मते जाणून घेत महापालिका निवडणुकीचा आढावा घेतला. लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, नाराजी घरी चालते’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नाराजी नाट्याला धुडकावून लावले.

सुळे म्हणाल्या, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई तसेच इतर महापालिकांमध्ये पक्षाच्या प्रचाराची धुरा आपण सांभाळणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत अद्याप कोणतीही ठोस चर्चा झालेली नाही. सर्व कार्यकर्त्यांशी बोलूनच जो काही तो निर्णय होईल. पूर्ण शंका निरसन होत नाही, तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. पुण्यात चांगला बदल हवा असेल, तर महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन महापालिका निकडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यादृष्टीने शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासमवेत आमची चर्चा सुरू आहे.

जगताप यांच्याशी सहा तास चर्चा केली

प्रशांत जगताप यांच्याबाबत राजीनामा व नाराजीच्या चर्चेवर सुळे म्हणाल्या, प्रशांत जगताप यांच्याशी दोन दिवसांत सहा तास चर्चा झाली आहे. त्यांच्या मागण्या योग्य आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा, ही त्यांची भूमिका आहे. पुण्याच्या हितासाठी चर्चा होत असेल तर, त्यामध्ये गैर काय ? मात्र, सगळ्या कार्यकर्त्यांचे मत विचारत घेऊनच पक्ष निर्णय घेईल.

पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष, माजी महापौर प्रशांत जगताप यांनी बुधवारी पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्त्वाचा तसेच शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हा निर्णय कोणत्याही रागलोभातून नव्हे, तर वैचारिक स्पष्टतेतून आणि सदसद्विवेक बुद्धीने घेतला आहे. मतदारसंघातील नागरिकांची मते जाणून घेत पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.

पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष एकत्र आल्यास प्रशांत जगताप यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. अखेर त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

राजीनाम्यानंतरही पुणेकरांच्या प्रश्नांसाठी लढा सुरूच राहील, असा निर्धार जगताप यांनी व्यक्त केला. आगामी महापालिका निकडणूक आपण लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.