
व्हिला बुक करण्याच्या नावाखाली आगाऊ रक्कम घेऊन फसवणूक करणाऱ्याला वनराई पोलिसांनी अटक केली. आकाश जाधवांनी असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याचे बोलले जाते.
तक्रारदार हे गोरेगाव येथे एका खासगी कंपनीत काम करतात. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी ऑगस्ट महिन्यात दोन दिवस सहलीचे आयोजन केले होते. कर्मचाऱ्यांसाठी सहल लोणावळा येथे आयोजित केली जाणार होती. त्यासाठी व्हिला बुक करण्याची जबाबदारी ही तक्रारदार यांच्याकडे होती. व्हिलाची माहिती काढत असताना त्यांना सोशल मीडियावर एक जाहिरात दिसली. त्या जाहिरातीखाली एक नंबर होता. त्या नंबरवर त्यांनी फोन केला. तेव्हा व्हिला उपलब्ध असून दोन दिवसांसाठी दीड लाख रुपये भाडे होईल असे सांगण्यात आले. व्हिला बजेटमध्ये असल्याने त्यांनी होकार दिला. होकार दिल्यावर व्हिला बुकिंगचे पैसे देण्याचे आश्वासन दिले. तक्रारदार यांनी बँक खात्यात दीड लाख रुपये पाठवले.
त्यानंतर 14 ऑगस्टला एकाने तक्रारदार यांना फोन करून व्हिला बंद असल्याचे सांगितले. ते पैसे सात ते आठ दिवसांत परत मिळतील असे सांगून फोन कट केला. आठवडा उलटून गेल्यानंतर पैसे परत केले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या नंबरवर फोन केला. तो नंबर बंद होता. घडल्याप्रकरणी त्यांनी वनराई पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांना आकाशची माहिती मिळाली. पोलिसांनी आकाशला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.



























































