हापूसच्या माहेरातून केशर इलो, देवगडची पहिली पेटी एपीएमसीत; डझनाला मिळाला तीन हजार रुपयांचा दर

हापूसचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या देवगडमधून केशर आंब्याची पहिली पेटी आज एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये दाखल झाली. या पेटीचे व्यापारी आणि ग्राहकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. चार डझन आंबे असलेली ही पेटी तब्बल १२ हजार रुपयांना विकली गेली. हंगामातील पहिल्या पेटीत आलेला आंबा चक्क तीन हजार रुपये डझन या दराने विकला गेला. आंब्याची पहिली पेटी जरी आज आली असली तरी आंब्याचा हंगाम पूर्ण क्षमतेने मार्च २०२६ पासून सुरू होणार आहे.

संपूर्ण कोकण किनारपट्टीत हापूस आंबा पिकवला जात असला तरी खवय्यांची सर्वाधिक मागणी देवगड हापूसला असते. सर्व भागांतील आंब्यापेक्षा देवगड हापूस हा चढ्या दराने विकला जातो. त्यामुळे देवगडमधील आंब्याचे ग्राहकांना विशेष आकर्षण असते. मात्र देवगडमध्ये हापूसबरोबर केशर आंबाही काही शेतकऱ्यांनी विकसित केला आहे. देवगडमधील केशर आंब्याची पहिली पेटी आज एपीएमसीच्या मार्केटमध्ये दाखल झाली. देवगडमधील शेतकरी जावेद मुल्ला यांच्या बागेत पिकवलेला हा आंबा आहे. विशेष नियोजन करून तो पिकवण्यात आला आहे. आज ही पेटी एपीएमसीचे संचालक संजय पानसरे यांच्या गाळ्यावर आल्यानंतर व्यापारी आणि ग्राहकांनी तिची विधिवत पूजा केली. यंदाचा हंगाम चांगला होऊ दे, असे साकडे परमेश्वराला घातले.

यंदाचा सिझन समाधानकारक

कोकणातील हवामान यंदा चांगले असल्यामुळे हापूसचा हंगाम समाधानकारक जाण्याची शक्यता आहे. पहिल्या मोहोरपेक्षा दुसऱ्या आणि तिसऱ्या मोहोरचा हंगाम चांगला चालणार आहे. हापूसचा हंगाम सुरू होण्यास वेळ असला तरी सध्या बाजारात आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक आणि तामीळनाडूमधील आंब्याची आवक सुरू आहे, असे एपीएमसीचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.