माता न तू वैरिणी; नवजात बालिकेला रस्त्यावर फेकले, कुत्र्याने लचके तोडले

बोईसर परिसरात मजूर म्हणून काम करत असलेल्या एका मातेने आपल्या चार दिवसांच्या नवजात बालिकेला चक्क रस्त्यावर फेकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. तिच्यावर कुत्र्याने हल्ला करून लचके तोडल्याने नवजात बालिका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या गुजरातच्या वलसाडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हे कृत्य करणारी माता नव्हे तर वैरिणी असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

मजूर महिला चार दिवसांपूर्वी प्रसूत झाली. तिने आपले बाळ चक्क रस्त्यावर टाकले. तेथील कुत्र्यांनी त्या बालिकेचे लचके तोडल्याने ती रक्तबंबाळ झाली. स्थानिक ग्रामस्थांना ही बाब समजताच त्यांनी हे धक्कादायक कृत्य करणाऱ्या महिलेचा शोध घेऊन तिला खडसावले. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने पुन्हा ते बाळ आपल्या ताब्यात घेतले. तिने आपल्या बाळाला रस्त्यावर का सोडले याची चौकशी सध्या पोलीस करीत आहेत. पोलिसांनी खडसावताच तिने वेगवेगळी उत्तरे दिली. प्रथम तिने आपल्या हातातून बाळ पडल्याचे सांगितले व नंतर आंघोळीला नेत असताना बाळाला जखमा झाल्याचे कारण सांगितले. या विसंगतीमुळे पोलिसांचा संशय अधिक वाढला आहे.