मेहकर तालुक्यातील दुधा शिवारात बिबट्याचे पिल्लू सापडले; परिसरात भीतीचे वातावरण

Leopard Cub Found in Dudha Shivar, Mehkar; Panic Grips Local Residents

मेहकर तालुक्यातील दुधा शिवारात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास बिबट्याचे अंदाजे २५ दिवसांचे पिल्लू आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पिल्लाला सुरक्षित ताब्यात घेतले. बिबट्याच्या मादीचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून सकाळपासूनच मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, बारा तास उलटूनही पिल्लाची माता सापडलेली नाही.

या घटनेला दुजोरा देताना घाटबोरी वनपरिक्षेत्राधिकारी अंकुश येवले यांनी सांगितले की, “आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान दुधा शिवारात नुकतेच जन्मलेले सुमारे २५ दिवसांचे बिबट्याचे पिल्लू सापडले असून वनविभागाने ते सुरक्षित ताब्यात घेतले आहे. पिल्लाच्या मादीचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.”

दरम्यान, दुधा परिसरासह हिवरा आश्रम जवळील पोखरी शिवारात काल दुपारी चारच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच वाढले असून वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

वनविभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून पिल्लाच्या सुरक्षिततेसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे.ऱ