
सध्याचा भारतीय जनता पक्ष हा मोदींच्या करंगळीवर उभा असलेला डोलारा आहे. वैचारिक आधार असता तर, एमआयएमसोबत युती झाली नसती. काँग्रेससोबत फार युती केली नसती, असा जोरदार हल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेली संयुक्त मुलाखत गुरुवारी प्रसिद्ध झाली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी या सगळ्यांचा डोलारा हा फक्त नरेंद्र मोदींवर अवलंबून आहे, असे विधान केले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे चुकीचे काय बोलले. सध्याचा भाजप हा मोदींच्या करंगळीवर उभा असलेला डोलारा आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि स्थानिक राजकारणात स्वत: मोदी डगमगलेले आहेत. त्यामुळे हा डोलारा फक्त एका करंगळीवर जेमतेम पेलला आहे. अशावेळी राज ठाकरे असे म्हणताहेत की, तो कधीही कोसळून पडेल आणि तो कोसळण्याची वाट देशाची जनता पाहत आहे.
भाजपच्या या डोलाऱ्याला भक्कम असा आधार नाही. भक्कम वैचारिक आधार असता तर एमआयबरोबर युती झाली नसती. काँग्रेस बरोबर युती केली नसती. फार गदारोळ झाल्यावर कारवाया घेतल्या, असे संजय राऊत म्हणाले.
ठाकरे ब्रँडमुळे सैरभैर झालेल्या सत्ताधारी बेताल विधानं करत आहेत. याचा संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातची शाकाहारी ब्रँड प्यायली असल्याची टीका राऊत यांनी केली. ते पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखानंतर त्याच्याच आशीर्वादाने आम्ही निवडणुका लढलेलो आहोत आणि चांगल्या प्रकारे जिंकलेलो आहोत. आमच्याबरोबर तुम्हीही त्या सत्तेत सहभागी झालेला आहात. आज जर मोदी ब्रँड असेल असे तुम्ही म्हणताय, मग मोदी नसतील तेव्हा तुम्ही कोणत्या ब्रँडची ब्रँडी पिणार आहात? असा सवाल राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख हे महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणातील ब्रँड होते. जसे महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यामुळे अशा विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी बोलू नये. त्यांनी वर्तमानावर बोलावे. बाळासाहेबांच्या चर्चा करण्याचे किंवा त्यांच्या विषयी भूमिका घेण्याचे कारण नाही. ज्या शिवसेनाप्रमुखांचा पक्ष तुम्ही फोडला, चिन्हाची चोरी करून दुसऱ्यांना दिले त्यांनी शिवसेनाप्रमुखांचा उल्लेख करावा हे आश्चर्य आहे.




























































