
वेदांता समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अनिल अग्रवाल यांचे सुपुत्र अग्निवेश अग्रवाल यांचे अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. न्यूयॉर्कमधील माऊंट सायनाई रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे उद्योगजगतात मोठी शोककळा पसरली आहे.
अग्निवेश अग्रवाल यांचा काही दिवसांपूर्वी स्किइंग करताना भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर त्यांना तातडीने न्यूयॉर्कच्या माऊंट सायनाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. मात्र, दुर्दैवाने प्रकृती सावरत असतानाच त्यांना कार्डिएक अरेस्ट आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. स्वतः अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही अत्यंत वेदनादायी आणि चटका लावून जाणारी बातमी दिली आहे.
मुलाच्या निधनानंतर अनिल अग्रवाल यांनी एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ”आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस असल्याचे सांगताना त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. एका पित्यासाठी मुलाला गमावण्याचे दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अग्निवेश हा केवळ माझा मुलगा नव्हता, तर तो माझा मित्र, माझा अभिमान आणि माझे संपूर्ण जग होता, अशा शब्दांत त्यांनी आपल्या मुलाबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. या घटनेमुळे अनिल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी किरण अग्रवाल यांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण कुटुंब कोलमडले आहे. या कठीण प्रसंगातही अनिल अग्रवाल यांनी वेदांता समूहातील हजारो तरुण कर्मचाऱ्यांचा उल्लेख करत ते सर्व आपल्या मुलांसारखेच असल्याचे म्हटले आहे. आपल्या मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ समाजसेवेसाठी आपल्या उत्पन्नाचा मोठा वाटा खर्च करण्याचा जो संकल्प केला होता, तो यापुढे अधिक दृढपणे सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
अनिल अग्रवाल यांना अग्निवेश आणि प्रिया अशी दोन अपत्ये आहेत. अग्निवेश यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरून आणि उद्योग विश्वातून अनिल अग्रवाल यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.






























































