ट्रम्प यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’ फुटणार; हिंदुस्थानवर 500 टक्के टॅरिफ लावणार, पुढील आठवड्यात मोठा निर्णय घेण्याची तयारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा टॅरिफ बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर हा टॅरिफ बॉम्ब फुटणार आहे. यासाठी ट्रम्प प्रशासनाने एका नवीन विधेयकाला मंजुरी दिली असून यामुळे हिंदुस्थान, चीनमधून अमेरिकेत निर्णय होणाऱ्या मालावर 500 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावला जाऊ शकतो.

गेल्या साडे तीन वर्षांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत आहेत. मात्र यास यश मिळालेले नाही. या प्रयत्नांचा भाग म्हणून अमेरिकेने रशियाकडून तेल घेणाऱ्या देशांवर जास्तीचा टॅरिफही लादला. आता या देशांवर आणखी टॅरिफ लादण्याची तयारी करण्यात आली असून यासाठी एका नवीन विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. पुढील आठवड्यामध्ये संसदेत या विधेयकावर मतदान होणार आहे, अशी माहिती रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली.

काय आहे हे विधेयक?

जे देश रशियाकडून युरेनियम आणि पेट्रोलियम उत्पादनांची खरेदी करतील त्यांच्यावर 500 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क (Tariffs) लादण्याची धमकी देण्यात आली आहे. रिपब्लिकन सिनेट सदस्य लिंडसे ग्रॅहम यांनी माहिती दिली की, ट्रम्प यांनी या विधेयकाला हिरवा कंदिल दाखवला आहे. याचा फटका बसणाऱ्या देशांमध्ये हिंदुस्थान, चीन, ब्राझिल या देशांचाही समावेश असल्याचे ग्रॅहम यांनी स्पष्ट केले आहे.