
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी
आयुर्वेदात शरीराबाबत अशी काही परीक्षणे सांगितली आहेत की, ज्यामुळे रोग पूर्ण जखडण्याआधीच वेळीच ओळखून औषधोपचार घेऊ शकता. निसर्गत रोगाची पूर्वलक्षणे आपले शरीर आपल्याला सांगत असते. त्याचेच निरीक्षण करून प्राचीन काळापासून वैद्यांनी ही परीक्षणे नोंदवली. रुग्णाचे परीक्षण दर्शन स्पर्शन आणि प्रश्न या त्रिविध परीक्षणाने करावे असे आयुर्वेद सांगते,
शीर्षक वाचून दचकला असाल, पण खरेच ही वस्तुस्थिती आहे.आयुर्वेदात अशी काही परीक्षणे सांगितली आहेत की, ज्यामुळे रोग पूर्ण जखडण्याआधीच वेळीच ओळखून औषधोपचार घेऊ शकता. त्यासाठी मोठमोठय़ा उपकरणांची, रसायनांची गरज नाही. हजारो वर्षे परकीय आक्रमणातून आयुर्वेद टिकलाय ते याच कारणामुळे. निसर्गत रोगाची पूर्व लक्षणे आपले शरीर आपल्याला सांगत असते. त्याचेच निरीक्षण करून प्राचीन काळापासून शास्त्रज्ञांनी ही परीक्षणे नोंदवली. हो आपण त्यांना शास्त्रज्ञच म्हणू या, जरी ऋषी मुनी असा ढोबळ उल्लेख इतिहासात करत असले तरी ते खरोखरच शास्त्रज्ञ होते. त्या काळात त्यांच्या भव्य परिषदा होत, त्यात नुसते मनोरंजन नव्हे तर अनेक विषयांवर चर्चा, अभ्यास, संशोधने होत. मान-अपमान बाजूला ठेऊन शास्त्र परिपूर्ण आणि मानवोपयोगी होण्याकरिता प्रयत्न केले जायचे. या चर्चासत्रांमधूनच चरकसंहिता, सुश्रुतसंहिता असे अनेक आयुर्वेदातील ज्ञानाची भंडारे लोकांसाठी खुली झाली. हे कुणा एकाचे काम नाही, अनेकांचा हातभार लागला आहे.
वैद्याने रुग्णाचे परीक्षण त्रिविध परीक्षणाने करावे असे आयुर्वेद सांगतो, दर्शन स्पर्शन आणि प्रश्न. नुसत्या नाडीपरीक्षण करून उपचार करणाऱयांपासून सावधान. रोगाचे निदान पूर्ण परीक्षण केल्याशिवाय करू नये. पूर्ण त्रिविध परीक्षण करून चिकित्सा केली तर नक्की यशस्वी होईल असे आयुर्वेद सांगतो, पूर्ण ज्ञान नसताना रुग्णांना पैसे कमावण्यासाठी औषधे विकणाऱयांना आयुर्वेद छद्मचर म्हणतो.
दर्शन म्हणजे बाहेरून निरीक्षण. मग त्यात त्वचा, डोळे, शरीराचा आकार, चालण्याची पद्धत असे अनेक प्रकारे रुग्ण परीक्षण केले जाते. त्यातूनच हे स्वपरीक्षण आले आहे.
स्वपरीक्षण कसे करावे? दिनचर्या सांगताना सकाळी उठून आपला चेहरा परातीसारख्या भांडय़ात पाणी ओतून त्यात पाहावा असे सांगितले आहे, ज्यामुळे तुमचे आयुष्य शंभर वर्षे टिकेल असे वर्णन आहे. आज आपल्याकडे आरशासारखे उपकरण आहे ज्यामध्ये तुम्ही आपला चेहरा वाचू शकाल.
पहिल्या प्रथम आपली जीभ तपासा. स्वच्छ, गुलाबी ओलसर जीभ म्हणजे निराम आरोग्याचे लक्षण आहे. जिभेवर पांढरा, पिवळा थर असणे हे अग्नी चांगला नसल्याचं लक्षण आहे. त्यासाठी सुंठ, मिरी, पिंपळी, आम पाचक वटी इत्यादींसारखी अनेक औषधे आहेत, पण वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत. तसेच दातांचे विकार असल्यास लवकरात लवकर दातांच्या डॉक्टरांकडून संपूर्ण तपासणी करून घ्यावी.
डोळे हेसुद्धा खूप काही सांगून जातात. पापण्या खाली ओढून डोळ्यांच्या खाली रंग तपासावा. पांढुरक्या पापण्या असणे रक्त कमी असल्याचे लक्षण आहे. तसेच पिवळसर रंग दिसल्यावर काविळीची शक्यता असली तर डॉक्टरांना दाखवून त्यावर उपचार करणे आवश्यक आहे.
मल परीक्षण- प्रभाते मलदर्शनम! असे विडंबन प्रख्यात विनोदी लेखकाने केले होते. विनोदाचा भाग सोडला तर आयुर्वेदाने खरोखरच ही एक महत्त्वाची परीक्षा सांगितली आहे. आज कमोडचा वापर घराघरांत होत आहे. त्यामुळे मल परीक्षण करणे अगदी सोपे आहे. त्यानुसार आले लिंब रस, हिंग, पंचलवण आणि अशी अनेक अग्निवर्धक औषधे आहेत ज्यांचा वापर वैद्यकीय सल्ल्यानुसार करता येईल.
मूत्राचा रंग, वास यात काही बदल लक्षात आला तर आजही रुग्ण आमच्याकडे धावत येतात. त्यामुळे त्याविषयी काही वेगळे सांगायला नको. परंतु मूत्र परीक्षणात काही अद्भुत परीक्षणे आयुर्वेदाने नोंदवली आहेत, त्यात पसरट भांडय़ात तीळ तेल घेऊन त्यात थेंब भर रुग्णाचे मूत्र टाकले की, ज्या दिशांना ते पसरेल त्यावरून रुग्णाचे आयुष्य, रोगाची दुर्धर परिस्थिती किती आहे याचा अंदाज लावण्याचे वर्णन ग्रंथात दिसून येते. अशी अनेकविध प्रकारची परीक्षणे वर्णन करून सांगितली आहेत. या लेखात ते सगळे समाविष्ट करता येणे शक्य नाही. नक्कीच जे काही या लेखात आहे याचा वापर करून आपले आरोग्य अधिक चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करू या.


























































