
>> अभय मिरजकर
लातूर जिह्यात सोयाबीन, तूर, ऊस, हरभरा, ज्वारी, गहू अशा पिकांचे क्षेत्र अधिक आहे. क्वचित काही शेतकरी वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. चाकूर येथील पाम अशोकराव पांडे (चाकूरकर) यांनी महाबीजच्या माध्यमातून तीन एकर क्षेत्रावर ( टी ए एम 108 या) नवीन मोहरीच्या वाणांची पेरणी करून लातूर जिह्यात एक वेगळी वाट निवडली आहे.
पारंपरिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी केवळ स्वतच्या कुटुंबासाठी खाण्यासाठी शेतात मोहरी, तीळ, भगर, राळ, भुईमूग, कांदा, लसण, मिरची, धने अशी वाण घेत असतात. लातूर जिह्यात सर्वाधिक पिकाचे क्षेत्र आहे ते सोयाबीनचे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे. लातूर जिह्यात ऊस, तूर, हरभरा, ज्वारी, गहू अशी पिके शेतकरी घेत असतात. उत्तरेकडील राज्यात तेलासाठी मोहरीचे उत्पादन घेतले जाते, परंतु महाराष्ट्रात मोहरीचे उत्पादन अधिक घेतलेही जात नाही आणि मोहरीचे तेल खाण्यासाठी वापरलेही जात नाही.
महाबीजच्या माध्यमातून चाकूर येथील पाम अशोकराव पांडे (चाकूरकर) यांनी चक्क तीन एकर क्षेत्रावर नवीन मोहरीच्या वाणाची पेरणी केली आहे. यासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, पट्टा पद्धतीने चार फुटांचे अंतर ठेवून तीन तासांची पेरणी करण्यात आली.
नोव्हेंबरमध्ये पेरणी करण्यात आली त्यासाठी दीड किलो (टी.ए.एम.108 वाण) बियाणे लागले. एकरी 5 ते 7 क्विंटल उत्पादन मिळेल असा अंदाज आहे. 2300 रुपये बियाणे खर्च, पेरणी, फंगीसाईड, ट्रायकोडार्मा, फॉलिक्युअर, मावासाठी रोगर आणि निम अर्क 13600 पी.पी.एम. ची फवारणी केली. खुरपणीसाठी 10 हजार रुपयांचा खर्च झाला. म्हणजे एकूण खर्च 32 हजार रुपयांच्या आसपास झालेला आहे. साधारण एकरी 5 क्विंटल उत्पादन अपेक्षित धरलेले आहे. 15 क्विंटल उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. साधारणपणे 10 हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला तरी दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. 95 दिवसांत मोहरीचे उत्पादन निघते व साधारणपणे 1 लाख 20 हजार रुपयांचा नफा मिळतो. यासाठी कोणतेही रासायनिक खत वापरलेले नाही.































































