
गोरेगाव पश्चिम भगतसिंग नगर नं.2 येथील एका घरात भीषण आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या आगीत संजोग पावसकर (48) यांच्यासह त्यांची दोन मुले हर्षदा पावसकर (19) आणि कुशल पावसकर (12) यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. फ्रिजचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोरेगाव पोलिसांनी याप्रकरणी सध्या एडीआर दाखल केला आहे. आगीचे नेमके कारण काय होते आणि फ्रिजचा स्फोट कशामुळे झाला, याचा सखोल तपास गोरेगाव पोलीस ठाणे आणि अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिम भगतसिंग नगर झोपडपट्टी येथील पावसकर कुटुंबातील सर्वजण गाढ झोपेत असताना घरातील फ्रिजचा अचानक मोठा स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की, काही क्षणातच संपूर्ण घराला आग लागली. घरातून बाहेर पडण्याची संधी मिळण्याआधीच घर आगीच्या विळख्यात सापडले. घराला प्लॅस्टिक शीट लावलेली असल्यामुळे आगीचा भडका अधिकच उडाला. काही मिनिटांतच घर पूर्णपणे जळून खाक झाले. या भीषण आगीत वडिलांसह दोन्ही मुलांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाडय़ा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत पावसकर कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा मृत्यू झाला.
कामावर गेलेली आई वाचली
या मुलांची आई रात्रपाळीच्या कामावर गेली होती. त्या घरी नसल्यामुळे या भीषण आगीतून सुदैवाने त्या बचावल्या, मात्र एका रात्रीत आपले संपूर्ण कुटुंब गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




























































