पंतप्रधान मोदींचे नवे कार्यालय सज्ज; याच महिन्यात रायसीना हिल्सवरून होणार कामकाजाचा श्रीगणेशा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रायसीना हिल्स परिसरातील नवे कार्यालय आता पूर्णपणे तयार झाले असून, या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान तेथे स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग असलेल्या या नव्या संकुलाला ‘सेवा तीर्थ’ असे नाव देण्यात आले आहे.

‘सेवा तीर्थ’ संकुलाची वैशिष्ट्ये अशी आहे की, या संकुलात एकूण तीन मुख्य इमारती आहेत. सेवा तीर्थ येथे पंतप्रधानांचे मुख्य कार्यालय (PMO) असेल. दुसरे सेवा तीर्थ येथे कॅबिनेट सचिवालयाचे कामकाज चालेल. सेवा तीर्थ तीनमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे कार्यालय असेल.

कामाच्या संस्कृतीत होणार बदल!

नव्या पीएमओमध्ये ‘ओपन फ्लोअर मॉडेल’चा वापर करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, यामुळे कामकाजाच्या संस्कृतीत सकारात्मक बदल घडून येईल. याशिवाय, परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी आणि बैठकांसाठी हाय-टेक खोल्या तयार करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानासोबतच हिंदुस्थानी संस्कृती आणि परंपरेची झलक पाहायला मिळेल.

ऐतिहासिक इमारतींचे संग्रहालयात रूपांतर!

स्वातंत्र्यापासून पंतप्रधानांचे कार्यालय ‘साउथ ब्लॉक’मध्ये होते. आता हे कार्यालय ‘सेवा तीर्थ’मध्ये हलवण्यात येत आहे. जुन्या नॉर्थ आणि साउथ ब्लॉकच्या इमारतींमध्ये आता ५००० वर्षांचा हिंदुस्थानचा इतिहास सांगणारे एक भव्य संग्रहालय उभारले जाणार आहे. या संग्रहालयाचा पहिला टप्पा पुढील वर्षाच्या सुरुवातीला खुला होण्याची शक्यता आहे.

निवासस्थानही बदलणार

पंतप्रधानांचे नवे निवासस्थानही या कार्यालयाजवळच बांधले जात आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान ७, लोककल्याण मार्ग हे आपले सध्याचे निवासस्थान सोडून नव्या घरात वास्तव्यास येतील.