
कांगडा जिल्ह्यातील २६ वर्षीय मर्चंट नेव्ही अधिकारी रिक्षीत चौहान यांच्या घरी लग्नाची लगबग सुरू असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिक्षीत काम करत असलेला रशियन तेलवाहू टँकर अमेरिकन सैन्याने उत्तर अटलांटिक महासागरात ताब्यात घेतला असून, गेल्या आठवड्यापासून रिक्षीत अटकेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मुलाच्या सुटकेसाठी मदतीची याचना केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रिक्षीत चौहान हे रशियन कंपनीच्या ‘मरीनेरा’ (Marinera) या तेलवाहू जहाजावर तैनात होते. कॅरिबियन समुद्रापासून सुरू झालेल्या प्रदीर्घ पाठलागानंतर ७ जानेवारी रोजी अमेरिकन नौदलाने हे जहाज उत्तर अटलांटिकमध्ये पकडले. या जहाजावर एकूण २८ कर्मचारी असून त्यापैकी तीन हिंदुस्थानी आहेत. यामध्ये रिक्षीतसह गोवा आणि केरळमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
लग्नापूर्वी सुटकेसाठी प्रार्थना!
रिक्षीतची आई रीता देवी यांनी रडत रडत पत्रकारांना सांगितले की, ‘माझ्या मुलाचे लग्न १९ फेब्रुवारीला ठरले आहे. ७ जानेवारीला आमचे त्याच्याशी शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर संपर्क तुटला असून १० जानेवारीला जहाज जप्त झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. सरकारने माझ्या मुलाला सुखरूप परत आणावे.’
रिक्षीतचे वडील रणजित सिंह यांच्या माहितीनुसार, रिक्षीत १ ऑगस्ट २०२५ रोजी मर्चंट नेव्हीमध्ये रुजू झाला होता. व्हेनेझुएलातील राजकीय तणावामुळे कंपनीने जहाज परत बोलावले होते, परंतु परत येत असतानाच अमेरिकेने ही कारवाई केली. जहाजावरील रशियन कर्मचाऱ्यांना सोडून देण्यात आले असले तरी, हिंदुस्थानींसह इतर कर्मचारी अद्याप ताब्यात आहेत.
केंद्राची भूमिका
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे की, हिंदुस्थानचे सरकार या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच, जहाजावर असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांची सविस्तर माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. स्थानिक आमदारही या प्रकरणी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारशी संपर्क साधत आहेत.


























































