मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचा भाजपचा आराखडा उद्ध्वस्त करा! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची गर्जना

मराठी माणसाच्या स्वाभिमानाला नख लावण्याचे काम या भाजपच्या सरकारने सुरू केले आहे. मराठी शहरे आणि त्यावरील मराठी ठसा पुसण्याचे काम पद्धतशीरपणे केले जात आहे. दिल्लीतून ऑर्डर येताच महाराष्ट्रातील जमिनी, जंगल, पाणी, वीज यांच्या उद्योगपती मित्रांच्या घशात घातले जात आहे. आम्हाला सत्तेचा हव्यास नाही. पण मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई, मीरा-भाईंदर, पालघर ही शहरे डोळ्यादेखत गुजरातच्या दावणीला बांधली जाऊ नयेत यासाठी हे युद्ध आहे. आम्ही केवळ जागा वाटपासाठी नव्हे तर मराठी माणसाला जागे करण्यासाठी एकत्र आलोय. मुंबई-महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी ठसा टिकवावाच लागेल. आज चुकाल तर या शहरांना मुकाल. मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचा या महाराष्ट्रद्वेष्टय़ांचा आराखडा उद्ध्वस्त करा, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली.

शिवसेनेला पहिली सत्ता देणाऱया ऐतिहासिक ठाणे नगरीत आज शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी शिवशक्तीची दणदणीत सभा झाली. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तोफा धडाडल्या. तलावपाळीच्या काठावरील मुख्य रस्त्यावर झालेल्या या सभेला तुफान रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती.

पूर्वीचा भाजप मेलाय – उद्धव ठाकरे

इंग्रजांनी आपल्याला लुटले नव्हते एवढे भाजपने आपल्याला लुटले आहे. नगरसेवकांसाठी कोटी कोटी रुपये वाटले जात आहेत. हा कोणता पैसा आहे? ड्रग्जचा पैसा आहे का? कोणाचे डान्स बार आहेत, कोणाच्या अवैध खाणी आहेत. पण सगळ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्लीन चिट देत सुटले आहेत. पूर्वीचा भाजप मेला आहे. पूर्वीच्या भाजपमध्ये राष्ट्र प्रथम होते. आताच्या भाजपमध्ये चोर प्रथम, गुंड प्रथम, हत्याकांडातील आरोपी प्रथम आहे. हे असले आयुष्य आपल्याला पाहिजे काय, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिंदे गटाने 1 कोटींपासून 5 कोटींपर्यंत आमिषे दाखवूनही ती धुडकावणाऱया उमेदवारांचा गौरव केला. ते पुढे म्हणाले, ठाणेकरांना मला विचारायचे आहे.. जर उमेदवाराला पाच कोटींची ऑफर येते तर आम्हाला किती कोटींची ऑफर येऊ शकते. पण आमच्यातले रक्त ठाकरेंचे आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे आम्ही नातू आहोत. पण नगरसेवक पदासाठी तुम्ही जे करोडो रुपये वाटताय तो दिलेला पैसा तुम्ही कोणाच्या खिशातून काढणार आहात आणि तुमच्या खिशात हात घालणार नसाल तर हा ड्रग्जचा पैसा आहे काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

आम्ही दोन भाऊ 20 वर्षांनी एकत्र आलो. जेव्हा एकत्र नव्हतो तेव्हा तुम्ही एकत्र कधी येणार असे हे बोंबलत होते. आता एकत्र आलो तर तुमचं जागा वाटप कसं झालं असे विचारताहेत. पण लक्षात ठेवा आमची युती जागा वाटपासाठी नाही तर मराठी माणूस जागा करण्यासाठी केली आहे, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

मुंबई, ठाण्याचा सत्यानाश झाला तर भाजपवाले पळून जातील

आज ठाण्यात विकासाची गती असे होर्डिंग्ज लागलेत.. पण ही गती विकासाची नाही तर विनाशाची आहे. विकासाची नाही तर विकासकाची आहे.. ज्या गतीने बिल्डरांसाठी कामे मंजूर केली जात आहेत. या बांधकामांमुळे झालेल्या प्रदुषणामुळे हवेच्या गुणवत्तेची वाट लागली आहे. मुंबई, ठाण्याचा सत्यानाश झाला तर हे भाजपवाले पळून जातील असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपला दवाखान्यात साडय़ांची दुकाने

मी मुख्यमंत्री असताना आपला दवाखाना ही योजना आणली. पण माझे सरकार पाडून मिंध्यांनी या योजनेची फीत कापली. या आपल्या दवाखान्यात औषधे नव्हे तर साडय़ांची दुकाने थाटली आहेत. या साडय़ा त्या गद्दाराला नेसवा असे तडाखे उद्धव ठाकरे यांनी लगावले. आपला दवाखान्याचे पंत्राट ज्याला दिले त्याला पैसे दिले नाहीत, कर्मचाऱयांना पगार दिला नाही. त्यामुळे जनहिताची ही योजना मिंधेमुळे बंद पडली असेही ते म्हणाले. गणेश नाईक म्हणतात यांचा टांगा पलटी करतो. मी म्हणतो, हे घोडे नाहीत भाजपची ओझी वाहणारी खेचरे आहेत. त्यांचा टांगा पलटी कराच, नाहीतरी उद्या भाजप या एकनाथ शिंदेला यूज अॅण्ड थ्रो करणारच आहेत.

ठाणे, नवी मुंबईची तिजोरी चाटून पुसून टाकली

मुंबई महापालिकेची गंगाजळी मी 92 हजार कोटींवर नेली. ती या हरामखोरांनी 70 हजार कोटींवर आणली. मुंबईच्या डोक्यावर 3 लाख कोटींचा घोटाळा केला आहे. ठाणे, नवी मुंबईची तिजोरी तर यांनी चाटून पुसून टाकली आहे. नरेंद्र मोदी मागे म्हणाले, बँक मे पैसा रखके विकास नाही होता.. हे मोदींचे षडयंत्र आहे. त्यांनी कारभार नासवला. देश अदानीच्या हातात देण्याची तयारी आहे.

महापालिकेच्या तिजोऱया खणून टाकायच्या, महापालिका भिकारी करून टाकायच्या, उत्पन्नाचे स्त्रोत दिल्लीला न्यायचे आणि मग आपल्याला दिल्लीकरांपुढे सारखी भीक मागायला लावायची, हा यांचा डाव असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पूर्वी छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी सूरत लुटली. आता हे दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहे. इंग्रजांनी जेवढं आपल्याला लुटले नाही तेवढं भाजपवाल्यांनी आपल्याला लुटले असे तडाखेही उद्धव ठाकरे यांनी लगावले.

भाजपचे सबकुछ दिखता है..

भाजप, शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या डान्स बार आणि अवैध खाणींविरोधात आमच्या शिवसेनेच्या आमदारांनी आवाज उठवला. पण फडणवीसांनी त्यांना क्लीन चीट दिली. वनजमिनी धनदांडग्या उद्योगपतींच्या घशात घातल्या, चिमुकल्या मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केले. साधुंच्या हत्या प्रकरणातील माणसाला भाजपमध्ये घेतले. सबकुछ दिखता है.. अशी एका पेनाची जाहिरात होती. तसेच भाजपचेही सब कुछ दिखता है.. असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. हे भाजपवाले कोणाचेच नाहीत, गद्दारही कोणाचे नाहीत. पण आपली बांधिलकी इथल्या मातीशी आणि इथल्या माणसांशी आहे असे ते म्हणाले.

हा ठाकरेंचा शब्द

मशाल, इंजिन, तुतारीला मत म्हणजे तुमच्या चांगल्या आयुष्याला मत आहे. ही निवडणूक तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणारी आहे. तुम्हाला दिलेली वचने पाळण्याची जबाबदारी आम्हा दोन भावांची आहे. हा ठाकरेंचा शब्द आहे आणि ठाकरे जे बोलतात ते करतात. पण ठाणेकर जे बोलणार ते करणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवसेना आणि ठाणेकर दोघेही फसले

गेली 25 वर्षे मुंबईकरांनी मुंबई महापालिका शिवसेनेकडे दिली. ठाणेकरांनीही शिवसेनेकडेच दिली.. गद्दारांना नव्हे. मिंधे गद्दार निघेल हे ठाणेकरांनाही माहित नव्हतं आणि मलाही माहित नव्हतं. तुम्ही आम्ही विश्वास ठेवला.. पण आपण दोघेही फसलो आहोत. मुंबईत जशी मी विकासाची पुस्तिका दिली तशीच ठाण्यातही देणार आणि विकासाचा दिलेला शब्द पूर्ण करणार अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

वनजमीन विकणाऱयांवर शूट अॅट साईनची ऑर्डर काढणार काय?

बोरिवलीजवळील हजारो एकर वनजमीन या मिंधेच्या जवळच्या उद्योगपतीला देऊन टाकली आणि बावनकुळे म्हणतात की ही वनजमीन आहे हे मला माहितच नाही. मग तुम्ही त्या मंत्रीपदावर झक मारायला बसलात काय असे तडाखे उद्धव ठाकरे यांनी लगावले. मी मुख्यमंत्री असताना जंगले वाढवली आहेत. बिबटे दिसल्यावर शूट अॅट साईटची ऑर्डर देणारे वनमंत्री गणेश नाईक जंगलाची जमीन विकणाऱयांवर ‘शूट अॅट साईन’ची ऑर्डर काढणार आहेत काय?, तेवढी हिंमत नाईकांमध्ये आहे काय असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

आमच्या घरात घुसून दादागिरी कराल तर कानफटवल्याशिवाय राहणार नाही

मराठी आमची आई आहे आणि हिंदी आमची मावशी आहे असे सांगणारा बोरिवलीतील गद्दार म्हणाला, आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे. पण मी म्हणतो मावशी, काकी कोणीही असू द्या.. आम्हाला आमची आईच पाहिजे. इतर भाषांना आमचा विरोध नाही, पण आमचा आग्रह मराठीसाठीच आहे. आमच्या घरात घुसून दादागिरी कराल तर कानफटवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

मराठीचा मान राखलाच पाहिजे

शिवसेनेची राज ठाकरे यांची आणि शरद पवारांची सत्ता आली तर मुंबई, ठाण्याचा महापौर मराठीच होईल असे आम्ही म्हटले तर बिघडले कुठे? शिवसेनाप्रमुख सांगायचे की देशात आम्ही हिंदू आहोत आणि महाराष्ट्रात मराठी. प्रत्येक राज्यात त्या भाषेचा मान राखला गेलाच पाहिजे. आम्ही आमच्या घरात आमच्या भाषेचा मान राखा असे सांगत आहोत. तुमच्या घरात घुसून मागत नाही. इतर राज्यात जाऊन दादागिरी करणारा एक तरी मराठी माणूस मला दाखवा तिथे उभा चिरतील त्याला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.