
अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडीच्या निमित्ताने राज्यातील सत्ताधारी महायुतीत आज ठिणगी पडली. उपनगराध्यक्ष निवडीच्या सभेत भाजप आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला. पालिकेत भाजपचा नगराध्यक्ष असला तरी शिंदे गटाने अजित पवार गटाला सोबत घेऊन उपनगराध्यक्ष निवडीत भाजपचा पराभव केला. हा पराभव जिव्हारी लागल्याने भाजपने सभागृहातच शिंदे गटाच्या विरोधात गद्दार.. गद्दार अशा जोरदार घोषणा दिल्या. सभागृहाच्या लॉबीत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी तर नवनियुक्त उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांना चपला दाखवल्या. भाजप आणि शिंदे गट एकमेकांना भिडल्याने पालिकेच्या पहिल्याच सभेत मोठा तणाव निर्माण झाला.
महिनाभरापूर्वी झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत शिंदे गटाचे २७, भाजपचे १४, काँग्रेसचे १२ आणि अजित पवार गटाचे ४ नगरसेवक निवडून आले. पालिकेत सर्वाधिक जागा शिंदे गटाने जिंकल्या असल्या तरी नगराध्यक्ष निवडीत शिंदे गटाचा लाजिरवाणा पराभव झाला. भाजपच्या तेजश्री करंजुले-पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या. नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली तरी भाजपला पालिकेत बहुमत मात्र राखता आले नाही. उपनगराध्यक्ष आणि विषय समित्या आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने असंविधानिक डाव टाकत काँग्रेसचे सर्व १२ नगरसेवक फोडून आपल्या पक्षात घेतले. त्यानंतर भाजपचे १४, काँग्रेसचे फुटीर १२ आणि अजित पवार गटाचे ४ असा ३० नगरसेवकांचा एकत्रित गट तयार करून अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करून जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी केली. मात्र आज अजित पवार गटाने उपनगराध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी भाजपची साथ सोडून शिंदे गटाशी हातमिळवणी केली. त्यामुळे भाजपचा पराभव झाला.
एकनाथ शिंदे टेंडरसम्राट, गणेश नाईक बकासुरसम्राट; नवी मुंबईत शिवसेना, मनसेचे पुरस्कार जाहीर
… आणि कमळ कोमेजले
शिंदे गटाला सत्तेपासून बाहेर ठेवण्यासाठी भाजपने केलेली चाल मात्र आज त्यांच्यावरच उलटली. अजित पवार गटाच्या सदाशिव पाटील याना उपनगराध्यक्षपदाची ऑफर देत भाजपसोबत असलेल्या अजित पवार गटाच्या चार नगरसेवकांना शिंदे गटाने आपल्याकडे वळवले. आम्ही अंबरनाथ विकास आघाडीमधून बाहेर पडत असल्याचे पत्र अजित पवार गटाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना देत शिंदे गटाशी सोयरीक केली. त्यामुळे भाजपला जोरदार झटका बसला. आज उपनगराध्यक्ष निवडीत भाजपच्या प्रदीप पाटील यांचा ३२ विरुद्ध २८ मतांनी पराभव झाला. उपनगराध्यक्ष निवडीत कमळ कोमेजल्याने भाजपच्या जिव्हारी लागले. सभेतच भाजप नगरसेवकांनी गद्दार.. गद्दार अशा घोषणा देत शिंदे गटाला डिवचले. तर महिला कार्यकर्त्यांनी उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांना चप्पल दाखवत आपला संताप व्यक्त केला.


























































