इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर 25 टक्के टॅरिफची घोषणा, हिंदुस्थानवर काय होणार परिणाम?

व्हेनेझुएलावरील लष्करी कारवाईनंतर आता अमेरिकेची नजर इराणवर पडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका लष्करी कारवाई करू शकतो असे संकेत व्हाईट हाऊसने दिले आहेत. एवढेच नाही तर अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना तात्काळ इराण सोडण्याचे आदेश दिले. एवढेच नाही इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिकेने इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. याचा थेट फटका हिंदुस्थानलाही बसणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून याची माहिती दिली. तसेच याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचीही घोषणा ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका जगभरातील अनेक देशांना बसणार आहे. खास करून हिंदुस्थान, चीन आणि यूएईला यामुळे सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थानला दुहेरी फटका

हिंदुस्थान, चीन, तुर्की, यूएई, पाकिस्तान आणि आर्मेनिया इराणचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार आहेत. याआधी रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लावले होते. अशात इराणचा व्यापारी भागीदार म्हणूनही हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ लागण्याची शक्यता आहे. यामुळे आधीचा 50 टक्के आणि आणखी 25 टक्के असा एकूण 75 टक्के टॅरिफ हिंदुस्थानला चुकवावा लागू शकतो.

आकडेवारीनुसार, हिंदुस्थान आणि इराणमध्ये आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 1.68 अब्ज डॉलरचा (15 हजार 158 कोटी रुपये) व्यापार झाला होता. यात हिंदुस्थानने इराणला 1.24 अब्ज डॉलरचा (11 हाजर 188 कोटी रुपये) माल निर्यात केला होता, तर इराणकडून 0.44 अब्ज डॉलरचा (3 हजार 970 कोटी) माल आयात केला होता.

तात्काळ इराण सोडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश, कोणत्याही क्षणी लष्करी कारवाईची शक्यता