
निवडणूक प्रचाराचा कालावधी संध्याकाळी साडेपाच वाजता संपल्यावर पूर्वी गावागावात रात्रीच्या वेळेस गुपचूप होणाऱ्या प्रचाराला ‘कंदील प्रचार’ आणि ‘चुहा प्रचार’ म्हणून ओळखले जायचे. मुदत संपल्यावर प्रचार करताना कार्यकर्ते कारवाईच्या भीतीने घाबरत असत, पण यंदा निवडणूक आयोगाने मुदत संपल्यावरही प्रचाराला मुभा दिली आहे. त्यामुळे कंदील प्रचार आता अधिकृतपणे उजेडात सुरू झाला आहे.
महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची मुदत आज (मंगळवारी) साडेपाच वाजता संपुष्टात आली आहे. पण तरीही प्रचार सुरू ठेवण्यास आयोगाने मान्यता दिली आहे. त्याचे पडसाद आज झालेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत उमटले.
प्रचारासाठी घेतला 2012च्या आदेशाचा आधार
संध्याकाळी साडेपाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्यावर उमेदवाराला घरोघरी उमेदवाराला प्रचाराला मुभा दिल्याच्या मुद्दय़ावरून माध्यम प्रतिनिधींनी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना वाघमारे यांची तारांबळ उडाली. साडेपाचनंतर निवडणूक सभा घेण्यास मज्जाव आहे, पण पाच जणांपेक्षा अधिक लोकांना मतदारांच्या घरी जाता येणार नाही असे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर अखेरीस साडेपाचनंतर घरोघरी प्रचार करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या 2012च्या स्थायी आदेशाचा आधार घेतला
परस्परविरोधी आदेशाचा फायदा
वास्तविक साडेपाचनंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर कोणतीही स्पष्टता नाही असे एकीकडे या आदेशात म्हटले आहे. दुसरीकडे मतदान केंद्राच्या 100मीटरच्या बाहेर उमेदवार घरोघरी प्रचार करू शकतील असेही नमूद केले आहे. त्याचा फायदा घेत साडेपाचनंतर प्रचार सुरू आहे.
आदेशात स्पष्टता नाही, पण घरोघरी प्रचाराला मुभा
राज्य निवडणूक आयोगाने 14 फेब्रुवारी 2012मध्ये जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने वितरित केलेल्या आचारसंहितेबाबतच्या पुस्तिकेमध्ये असलेल्या प्रश्नावलीतील प्रश्न क्र. 53वर जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यावर इलेक्ट्रॉनिक्स मीडियाद्वारे प्रचार बंद राहील आणि एसएमएसचादेखील समावेश राहील असे नमूद आहे. तथापी सदरहू सूचनेमध्ये जाहीर प्रचार बंदीनंतर उमेदवाराने घरोघरी जाऊन प्रचार करणे यासंदर्भात कोणतीही स्पष्टता नाही. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर उमेदवार हे मतदान केंद्राच्या 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील, परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहाने फिरता येणार नाही. राज्य निवडणूक आयुक्तांच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाचे तत्कालीन अवर सचिव ध. मा. कानेड यांची सही आहे.

























































