आमदार सतेज पाटलांचा महायुती आमदाराविरोधात व्हिडीओ बॉम्ब, ठेकेदाराकडून 40 लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत महायुतीच्या आमदाराची ‘टक्केवारी’ पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली आहे. सत्ताधारी एका आमदाराने तरुण ठेकेदारांकडून तब्बल 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडियावर जारी करत, ‘इज इट ट्रू’ असा सवाल केला आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनाही व्हिडीओ

टॅग करत मतदानापूर्वी सरकारकडून खुलासा करण्याची मागणी केली आहे. सतेज पाटील यांच्या या व्हिडीओ बॉम्बने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तो आमदार कोण, अशी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना सतेज पाटील म्हणाले, सत्तेत असणाऱया कोल्हापुरातील एका आमदाराने एका व्यक्तीकडून 40 लाख रुपये घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आमदारांवर एखादा आरोप होत असेल, तर त्याची सत्यता आणि पडताळणी होणे गरजेचे आहे. कारण लोकांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण होत असल्याने, हा व्हिडीओ आपण ऑफिशियल पेजवर टाकून तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना टॅग केला आहे. मतदानापूर्वी याचा खुलासा व्हावा. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱया त्या व्यक्तीला बोलावून त्याच्याकडून खातरजमा करून घेणे गरजेचे आहे. राज्यात जर भ्रष्टाचार होत असेल, तर विरोधी पक्ष म्हणून त्याला वाचा फोडणे ही आमची जबाबदारी आहे. या जिह्यात त्या पक्षाचे तीन आमदार आहेत. त्यामुळे त्यापैकी नेमका तो आमदार कोण, हा प्रश्न आहे. त्यामुळे त्या तिन्ही आमदारांना खुलासा करावा लागेल, असा सूचक इशारा देत हे आमदार शिंदे गटाचे असल्याची माहिती असल्याकडेही सतेज पाटील यांनी स्पष्ट अंगुलीनिर्देश केला आहे. दरम्यान, सरकारच्या सायबर सेलने याची तपासणी करणे गरजेचे असल्याचेही सतेज पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा मिसळ कट्टय़ाचा कार्यक्रम संपूर्ण क्रिप्टेड होता, असा आरोप त्यांनी केला.

नगरसेवक, महापौर पापी?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल कोल्हापुरातील कार्यक्रमात मागच्या जन्मी जो पाप करतो तो नगरसेवक, तर महापाप करणारा महापौर होतो, असे विधान केलेले आहे. त्यामुळे नगरसेवक आणि महापौर हे खरोखरंच पापी, महापापी असतात का? असा सवाल करत, भाजपला आता निवडून देऊ नका, असे आवाहनही पाटील यांनी केले.

हद्दवाढबाबत मुख्यमंत्र्यांचे हात बांधले होते का?

40 वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी शहराची एक इंचही हद्दवाढ झाली नाही. याबाबत जनतेकडून वारंवार मागणी झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीही आश्वासने दिली; पण आता महापालिका आमच्या ताब्यात द्या, 15 मिनिटांत हद्दवाढीवर सही करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या विधानाचाही सतेज पाटील यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांचे गेल्या दीड वर्षात हात बांधले होते का? तुम्हाला 15 मिनिटे मिळाले नाहीत का? असे सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केले आहेत.