
राज्यामध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता थांबली आहे. परंतु राज्यामध्ये सरकारमधील मंत्री गणेश नाईक यांनी एका मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील असे विधान केले होते. याच विधानावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना खुले आव्हान दिले आहे. संजय राऊत यांनी बुधवार (14 जानेवारी) माध्यमांशी संवाद साधताना हे आव्हान दिले आहे.
या प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले, ”एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील असे म्हणत, सरकारमधील मंत्री कोडी टाकत आहेत, ही कोडी टाकू नका, हिंमत असेल तर समोर येऊन स्पष्ट सांगा” असे म्हणत संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना खुले आव्हान दिले आहे. राऊत म्हणाले, ”गणेश नाईक यांना आव्हान आहे की, ही अशी कोडी टाकू नका. एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असे म्हणताय. मग कोणत्या कारणासाठी जातील?” हे स्पष्ट सांगा.
“एकनाथ शिंदे यांच्याकडे हरामाचा पैसा आहे, ते तोच पैसा वाटताहेत असं सरकारमधील एक मंत्री गणेश नाईक म्हणतात. मग तुम्ही उघडपणे हे सर्व का सांगत नाही. याला ब्लॅकमेलिंग म्हणतात, सध्या हे जे महाराष्ट्राच्या राजकारणात चाललं आहे ते अतिशय चुकीचं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार, गणेश नाईक यांच्याकडे महाराष्ट्राच्या हिताची काही माहिती असेल, तर त्यांनी ती लोकांसमोर उघड करायलाच हवी”असंही संजय राऊत म्हणाले.

























































