वडापावची थट्टा उडवणाऱ्यांना महाराष्ट्राचा संघर्ष, मराठी माणसाचा त्याग कळणार नाही; संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला

राज्यामध्ये निवडणुकांच्या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कमधील सभेत वडापावची थट्टा उडवली. याच मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी बुधवार (14 जानेवारी) माध्यमांशी संवाद साधताना या मुद्द्याला हात घातला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचा इतिहास, मराठी माणसाचा त्याग तसेच हिंदूहद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी केलेली जीवनभराची तपश्चर्या तपस्या माहीत असण्याचे कारण नाही.

राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्कच्या सभेत वडापावची थट्टा उडवतात. आम्ही काय दिलं तर वडापावच्या गाड्या दिल्या. तुम्ही किती रोजगार दिला ते आधी सांगा? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 60 वर्षांपूर्वी नोकऱ्या मिळत नसतील तर, वडापावच्या गाड्या लावा अर्थार्जन करा रिकामे बसू नका असा सल्ला दिला होता. हाच वडापाव मुंबई महाराष्ट्र नव्हे देशभरात नाही तर जगभरात गेला. जगभरात वडापाव मिळतो याचा अभिमान बाळगला पाहिजे.

वडापावच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल तरुणांनी केली आहे. आजही सामान्य मराठी कुटूंब दिवसाला ५ हजारापासून ते १ लाखांपर्यंत या वडापावच्या माध्यमातून उत्पन्न कमावत आहेत. ही मराठी माणसाची कष्टाची कमाई आहे. मुंबईसह उपनगरातल्या लोकांचं अन्न हे वडापाव आहे. झुणका भाकर ही शिवसेनेने सुरु केलेली आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे का? असा सवाल यावेळी राऊत यांनी विचारला. चांगल्या कामावर तंगडी वर करायची हे कामच आहे असेही राऊत यावेळी म्हणाले.

वडापावचा अपमान करु नका, वडा पाव महाराष्ट्राचा ब्रॅंड आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने हा वडापाव दिलेला आहे. त्यामुळे तु्म्हाला पोटदुखी होण्याची गरज नाही. तुम्ही काय दिलं महाराष्ट्राला ते आधी सांगा? असा प्रश्न यावेळी राऊत यांनी विचारला. दिल्लीला अटल कॅंटीन सुरु केलं तेही बंद पडलं.. तुम्ही इडली, मेदूवडा किंवा डोश्याची टिंगल कराल का.. मग वडापावची टिंगल करताय कारण तुमच्या मनात मराठी माणसांविषयी संस्कृतीविषयी द्वेश आहे. म्हणून तुम्ही वडापावची ठाकरे घराण्याची टिंगल करताय असे म्हणत राऊतांनी फडणवीसांना परखड बोल सुनावले.