
रायगड जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ गट तर १५ पंचायत समित्यांच्या ११८ गणांमध्ये ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर ७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार असल्याने ही निवडणूक राजकीय पक्षांची ‘अग्निपरीक्षा’ ठरणार आहे. जिल्ह्यात १७ लाख ३८१ मतदार असून, जिल्ह्यातील २ हजार ३२३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
रायगड जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांचा कार्यकाळ २२ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला आहे. तेव्हापासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकीय राजवट आहे. मात्र आता या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये १७ लाख ३८१ मतदार आहेत. त्यात ८ लाख ५७ हजार ९ महिला आणि ८ लाख ४६ हजार ३४७पुरुष तसेच इतर २५ मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात २ हजार ३२३ मतदान केंद्रे असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक अधिसूचना १६ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात येणार असून, उमेदवारांना १६ ते २१ जानेवारी दरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २२ जानेवारी रोजी करण्यात येईल, तर २७ जानेवारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे. मतदान प्रक्रिया ५ फेब्रुवारी रोजी तर मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.






























































