लेख – शांततेच्या प्रतीक्षेत जग

>> प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

इस्रायल-हमासमधील संघर्ष विराम हा मावळत्या वर्षातील अशांत-अस्वस्थ वातावरणातील शांततादर्शी किनारा ठरला खरा; परंतु 2026 मध्ये पदार्पण करताना सुरू झालेल्या नव्या संघर्षांमुळे जगाच्या डोक्यावरची संघर्षांची टांगती तलवार कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. चीन-तैवान यांच्यातील तणाव असो किंवा संयुक्त अरब अमिराती व सौदी अरेबिया यांच्यातील संघर्ष असो किंवा इराणमधील उठाव असो किंवा कंबोडिया-थायलंडमधील संघर्ष, या घटनांमुळे चालू वर्षातही जगाला पुन्हा एकदा अशांततेचा सामना करावा लागणार का, हा प्रश्न कळीचा बनला आहे.

संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनिओ गोटेरस यांनी म्हटल्याप्रमाणे सारे जग आज युद्धाच्या उंबरठय़ावर उभे आहे. या संघर्षग्रस्त आणि युद्धमय जगाला शांततेच्या सावलीत कसे आणून सोडायचे? हा खरा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना मूलतः जगामध्ये शांतता, स्थैर्य आणि विकास यांच्या प्रस्थापनेसाठी झाली. पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या लीग ऑफ नेशन्सचे अपयश हे मोठे दुःखद होते. त्यानंतर मोठय़ा आशाआकांक्षा ठेवून एफबी रुझवेल्ट यांच्या काळात संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धाने होरपळलेल्या जगात शांतता आणि स्थैर्यासाठी नवे सुरक्षित समृद्ध जग निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ स्थापन करण्यात आला; परंतु या नव्या जगात 1945 ते 2025 पर्यंत जगात अस्थिरता अशांतता तसेच दहशतवाद आणि हिंसाचाराने थैमान घातले आहे. अशा वेळी नव्या वर्षात जगामध्ये युद्धे कशी थांबतील आणि शांतता कशी प्रस्थापित होईल, याची चिंता निर्माण झाली आहे

संयुक्त राष्ट्र संघाचे अपयश

ज्या हेतूने आणि मानवजातीच्या कल्याणासाठी म्हणून संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना करण्यात आली होती ती उद्दिष्टे साध्य करण्यास ही संघटना अपयशी ठरली आहे. एकतर जगातील पाच राष्ट्रांना दिलेला नकाराधिकार आणि दुसरीकडे शांतीसेनेचा अभाव आणि युद्ध थांबण्याऐवजी जगात तणाव निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महासत्तांच्या स्वार्थी भूमिकेमुळे जगात सतत अशांतता दिसून येते. स्वतःला महासत्ता म्हणणारी राष्ट्रे तिसऱ्या जगाकडे शस्त्रास्त्रांची बाजारपेठ म्हणून पाहतात. दोन देशांमध्ये तणाव आणि युद्ध सतत कायम ठेवून तेथे तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्याचे महासत्तांचे तंत्र मोठे अद्भुत आहे. युद्धे थांबविण्याऐवजी त्यांना उत्तेजन देण्याच्या बडय़ा राष्ट्रांच्या स्वार्थी राजकारणामुळे अशी आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील देश हे शस्त्रास्त्रांची बाजारपेठ बनले आहेत. लढाऊ विमाने लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र आणि प्रगत आक्रमक शस्त्रास्त्रs यांच्या विक्रीवर महासत्तांचा भर दिसतो. त्यामुळे जगात युद्ध आणि तणाव कमी होण्याऐवजी ती सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते. एकीकडे शांतता कराराचे नाटक करायचे, दहशतवाद निपटून टाकण्याच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे दहशतवादी राष्ट्राला खतपाणी घालावे असे हे दुटप्पी तंत्र बडी राष्ट्रे वापरतात. त्यामुळे जगातून दहशतवादाचे समोर उच्चाटन करणे हे एक मोठे जटिल आव्हान होऊन बसले आहे. पाकिस्तानसारख्या देशाने राज्य प्रायोजित दहशतवाद ही नवी कल्पना विकसित केली आणि आपल्या देशात दहशतवाद प्रशिक्षण केंद्रे चालवली. समोरासमोरच्या युद्धात आपला निभाव लागत नाही हे लक्षात घेऊन या देशाने शेजारी देशावर छुपे दहशतवादी हल्ले करून तेथे रक्तपात घडविला आणि विकासाच्या प्रक्रियेला लगाम घालण्याचा प्रयत्न केला वर्तमान जगापुढे सर्वात मोठे आव्हान कोणते असेल तर ते दहशतवादाच्या समोर उच्चाटनाचे आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड निक्सन एका भाषणात म्हणाले होते की, खरे तर महासत्ता याच शांततेच्या खऱ्या रक्षक असतात, स्तंभ असतात, पण शांततेचे स्तंभ म्हणून खरोखर महासत्ता जबाबदारीने वागतात का? असा प्रश्न विचारल्यास त्या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड आहे. अलीकडील काळात जगाच्या बहुसंख्य भागातील तणाव लांबले आहेत, वाढले आहेत.

त्याचे खरे कारण महासत्तांचे दुटप्पी राजकारण हे आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी 2004 मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांना फोन करून दहशतवादापासून अमेरिकेला कसा धोका आहे ते सांगितले होते, पण पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध सावध कृती करण्याऐवजी बुश महोदयांनी त्याकडे कानाडोळा केला आणि 2005 मध्ये अमेरिकेवर ओसामा बिन लादेन यांनी जेव्हा दहशतवादी हल्ले घडवले तेव्हा अमेरिकेचे डोळे उघडले. एवढे महाभारत घडूनही बुश यांनी जी चूक केली तीच चूक डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. एकीकडे जागतिक व्यासपीठावर दहशतवादाचा निषेध करावयाचा आणि दुसरीकडे दहशतवादाचे प्रायोजकत्व घेणाऱ्या देशाला मागल्या दरवाजाने आर्थिक मदत करावयाची, हे कसले तंत्र? ही कसली लोकशाही? अशा धोरणांमुळे जागतिक राजकारणाचा असमतोल सतत बिघडत आहे. या दुटप्पीपणातूनच जगात अनेक ठिकाणी कायमची युद्ध केंद्रे व तणाव केंद्रे जन्माला आली आहेत

विकासाचा हा संदेश भारताने जगाला उपनिषद काळापासून दिला आहे. ‘सारे विश्व हे कुटुंब आहे’ हा संदेश ‘वसुधैव पुटुंबकम’ या मंत्रामध्ये प्रकट झाला आहे. शांततामय हा मानवी समाजाच्या भावी कल्याणाचा मार्ग होय, परंतु जगावर अंधार निर्माण करणारे युद्धाचे ढग जोवर दूर होत नाहीत तोवर शाश्वत विकासाची लक्षणे ही दूरच राहतील. आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील अनेक देश आज गरिबी, उपासमार आणि गुन्हेगारी तसेच हिंसाचार यामुळे अशांत व अस्थिर जीवन जगत आहेत. त्यांच्या जीवनात शांततेचा दीप कधी व कसा तेवत ठेवणार? हा खरा प्रश्न आहे. इस्रायल-हमासमधील संघर्ष विराम हा मावळत्या वर्षातील अशांत-अस्वस्थ वातावरणातील शांततादर्शी किनारा ठरला खरा; परंतु 2026 मध्ये पदार्पण करताना सुरू झालेल्या नव्या संघर्षांमुळे जगाच्या डोक्यावरची संघर्षांची टांगती तलवार कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. चीन-तैवान यांच्यातील तणाव असो किंवा संयुक्त अरब अमिराती व सौदी अरेबिया यांच्यातील संघर्ष असो किंवा इराणमधील उठाव असो, या घटनांमुळे चालू वर्षातही जगाला पुन्हा एकदा अशांततेचा सामना करावा लागणार का? हा प्रश्न कळीचा बनला आहे.

वास्तविक, जगाला आज युद्ध नव्हे, तर बुद्ध हवा आहे. जगाला आज कार्ल मार्क्स नव्हे, तर महात्मा गांधी हवे आहेत. सबंध जगाला आज भारतीय तत्त्वज्ञान नवा प्रकाश देऊ शकते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा ‘एकात्म मानवतावाद’ हा सिद्धांत सबंध जगाला नवा प्रकाश देणार आहे. अस्थिरतेच्या आणि अशांततेच्या भोवऱ्यात सापडलेल्या जगाला नवा प्रकाश देण्याचे सामर्थ्य भारतीय दर्शनात आहे. महात्मा गांधी यांच्या ‘हिंद स्वराज्य’ या ग्रंथातून होणार आहे.

गेल्या वर्षभरात सारे जग विश्वशांतीच्या मृगजळामागे धावत आहे. कितीतरी करारमदार झाले, शांततेच्या परिषदा झाल्या, पण शांतता मात्र गवसली नाही. त्यामागचे खरे कारण म्हणजे जगातील वाढती शस्त्र स्पर्धा आणि गटबाजी होय. जोपर्यंत जगात विवेक आणि विचार यावर आधारलेले नैतिक राजकारण जोपासले जात नाही तोवर हे मृगजळ सदैव कायम राहील. रशिया-युक्रेन युद्ध तीन वर्षे उलटली तरी सुरूच आहे. आता जगाच्या अनेक कानाकोपऱ्यात संघर्षाच्या खिडक्या उडताना दिसत आहेत. कंबोडिया आणि थायलंडमधला संघर्ष पेटला आहे. अनेक आफ्रिकन देशांतून ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मीयांत संघर्ष दिसून येत आहे. शिवाय दक्षिण आफ्रिकेत गोरे आणि कृष्णवर्णीय यांच्यातही संघर्ष कळत नकळत घडतोच आहे. बांगलादेशातील अंतर्गत संघर्ष असो की पाकिस्तानातील बलुची लोकांचा उठाव असो, या साऱ्यांची किनार नववर्षाला आहे. नव्या वर्षामध्ये तरी जगावरील युद्धाचे ढग मावळावेत, तणाव कमी व्हावा आणि मानवाच्या कल्याणासाठी सर्वांनी एकत्र येऊन विचार करावा एवढीच अपेक्षा!

(लेखक ज्येष्ठ विचारवंत आहेत.)