Donald Trump Nobel Peace Prize – अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना ‘नोबेल’ मिळालं!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कार मिळण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प अनेकदा आपल्याला नोबेल शांतता पुरस्कार मिळावा असे म्हणताना दिसले. मी आठ युद्ध थांबवली असून मला नोबेल पुरस्कार मिळायला हवा असा दावा त्यांनी केला होता. आता त्यांची ही इच्छा एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने पूर्ण होताना दिसत आहे.

व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या आणि नोबेल विजेत्या मारिया मचाडो यांनी आपला पुरस्कार ट्रम्प यांना देण्याची घोषणा केली. गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये मचाडो आणि ट्रम्प यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर मचाडो यांनी आपल्याला मिळालेला नोबेल शांतता पुरस्कार ट्रम्प यांना भेट दिल्याचे म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनीही याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.

मारिया मचाडो यांना गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला होता. यावेळी ट्रम्प यांनी नाराजीही व्यक्त केली होती. दरम्यानच्या काळात अमेरिकेने व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई केली आणि राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली. आता व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या आणि नोबेल विजेत्या मारिया मचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत त्यांना आपला पुरस्कार भेट दिला.

व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीनंतर मारिया मचाडो यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार भेट दिला. व्हेनेझुएलासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे, असे मला वाटते. आमचा राष्ट्रपती ट्रम्प यांच्यावर विश्वास आहे, असे मारिया मचाडो म्हणाल्या.

ते जिवंत कसे आहेत, हेच समजत नाही; ट्रम्प यांच्या डाएटवर अमेरिकेच्या आरोग्य सचिवांचे वक्तव्य

पुरस्काराचे हस्तांतरण करता येतो?

दरम्यान, नोबेल पुरस्काराचे हस्तांतरण करता येते की नाही याबाबत नोबेल समितीने स्पष्टीकरण दिले आहे. नोबेल पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर तो रद्द केला जाऊ शकत नाही. एवढेच नाही तर हा पुरस्कार कुणासोबत शेअरही करता येणार नाही आणि त्यांचे हस्तांतरणही करता येणार नाही. हा अंतिम निर्णय असल्याचे नोबेल समितीने सांगितले.